उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार कोसळले. त्यानंतर राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या भाजप प्रणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या सरकारची आज कसोटी आहे. या सरकारला विधिंडळाच्या विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करायचे आहे. अर्थात, नव्या सरकारने काल (3 जुलै) विधिमंडळ अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यामुळे सरकारला काहीसा आत्मविश्वास नक्कीच आला आहे. परंतू, आज खरी कसोटी असणार आहे. शिवसेनेतील एकनाथ शिंदे गट ( Eknath Shinde Group) विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आपापले व्हीप बजावले आहेत. त्यामुळे खरा व्हिप कोणाचा यावरुनही कायदेशीर पेच निर्माण होणार आहे. त्यामुळे सरकारचे काय होणार याबाबत मोठेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विधिमंडळ नियमानुसार आज सकाळी 11 वाजता विधानसभेचे कामकाज सुरु होईल. सभागृहाचे कामकाज सुरु होताच सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. सभागृहातील पक्षीय बलाबल पाहता भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. या पक्षाला शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटाने पाठिंबा दिला आहे. शिंदे गटाचा दावा आहे की, त्यांना 40 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे भाजपचे 105, शिंदे गटाचे 40 आणि अपक्ष असा बहुमताचा आकडा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जमवला आहे. (हेही वाचा, Maharashtra Politics: एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे गटनेते, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का)
भाजप हा सर्वात मोठा पक्ष असूनही या पक्षाने आपल्याकडे मुख्यमंत्री पद घेतले नाही. देवेंद्र फडणवीस हेच या सरकारमध्ये मुख्यमंत्री होतील अशी सर्वांचीच आशा, जवपास खात्री होती. मात्र, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने धक्कातंत्राचा वापर करत एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली. शपथविधी पूर्वी झालेल्या एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या पत्रकार परिषदेत स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी तशी घोषणा केली. दरम्यान, थोड्याच वेळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या आदेशावरुन देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले.
शिंदे-फडणवीस यांची कसोटी
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणीस यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदे स्वीकारली असली तरी, बहुमताचे गणित त्यांना आज जमवावे लागणार आहे. हे गणित जमवताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिवसेनेकडून कोणाचा व्हिप स्वीकारतात यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी नेमलेल्या प्रदोतचा व्हीप ग्राह्य असणार की, एकनाथ शिंदे गटाने नेमलेल्या प्रदोतचा व्हीप मान्य असणार याबाबत उत्सुकता आहे. त्यातच अध्यक्षांनी कोणाचा जरी व्हीप मान्य केला तरी, त्याला न्यायालयात आव्हान मिळणार हे नक्की. त्यामुळे सरकारची आज मोठीच कसोटी असणार आहे.