Eknath Khadse: एकनाथ शिंदे आणि भाजप यांची युती जुनीच, एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट
Eknath Khadse On Eknath Shinde | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे शिवसेनेतील (Shiv Sena) बंड पुन्हा नव्याने चर्चेत आले आहे. महाविकासाघाडीतील नेत्यांकडूनही यावर भाष्य केले जात आहे. एकेकाळी भाजपमध्ये ज्येष्ठ असलेले आणि मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले व सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) विधानपरिषदेतील आमदार असलेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनीही शिंदे यांच्या बंडावर भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे, त्यांचा गट आणि भाजप यांची युती आजची नाही. पाठिमागील प्रदीर्घ काळापासून ही युती चालत आली आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथ खडसे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

एकनाथ शिंदे यांचे एकूण वर्तन पाहता तुमच्या लक्षात येईल की, एकनाथ शिंदे यांनी आजवर भाजपवर केव्हाच टीका केली नाही. सत्तेत असतानाही त्यांनी भाजप आमदारांची कामे करण्यासच प्राधान्य दिले. त्यामुळे ही सलगी एका दिवसात नव्हे तर पाठीमागील अनेक महिन्यांपासून सुरु होती. भाजपसोबत जाण्याचा त्यांचा निर्णय यापूर्वीच झाला होता. केवळ एकनाथ शिंदेच नव्हे तर जळगावमधील नेते गुलाबराव पाटील यांचीही सलगी लपूर राहिली नव्हती, असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Devendra Fadnavis Cabinet: देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे गटासह कोणाला मिळेल संधी? पाहा चर्चित चेहेरे)

गुलाबराब पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडताना एकाथ खडसे यांनी म्हटले की, आजवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर अनेकदा अगदी टोकाची, खालच्या पातळीवरची टीका केली. पण, शिवसेना नेते अथवा सेनेचे मंत्री म्हणून गुलाबराव पाटील यांनी त्या टीकेला कधीही प्रत्युत्तर दिले नाही. त्यामुळे हिंदुत्त्व, राष्ट्रवादी काँग्रेसने निधी दिला नाही, हे केले जाणारे आरोप केवळ निमित्त आहेत. बंडखोर आमदारांचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय आगोदरच झाला होता.

एकनाथ खडसे यांनी या वेळी राज्यपालांनाही टोला लगावला. महाविकासआघाडी सरकार अल्पमतात असल्याचा भाजप नेत्यांनी दावा करताच तातडीने बहुमत चाचणी घेण्याची तत्परता राज्यपालांनी दाखवली. हीच तत्परता राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची फाईल मंजूर करण्याबाबत दाखवली असती तर राज्यपालांबद्दलचा आदर वाढला असता, असेही एकनाथ खडसे म्हणाले.