एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray ) यांनीही एकनाथ खडसे ( Eknath Khadse) यांच्या निर्णयाचे स्वागत करत आता ते महाविकासआघाडीचे घटक झाल्याचे म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला यशाची शिखरे गाठत असताना पायाचे दगड का ठिसूळ होत आहेत, निखळत आहेत? याचा विचार करण्याची आवश्यकता आहे, असा मित्रत्वाचा सल्लाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपला दिला आहे. एकनाथ खडसे यांची एक स्वतंत्र ओळख आहे. गेली अनेक वर्षे ते भाजपसाठी काम करत आहेत, असेही उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यातील विविध भागात दौरे करत आहेत. आज ते उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या वेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या वेळी एकनाथ खडसे यांच्याविषयी आणि शिवसेना भाजप युती तुटल्याविषयी प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्र्यांना विचारले. प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, एकनाथ खडसे हे स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे. त्यांची स्वतंत्र ओळक आहे. (हेही वाचा, Eknath Khadse Quits BJP: एकनाथ खडसे यांनी सांगितले भाजप सोडण्याचे कारण, पाहा ट्विटमध्ये काय म्हणाले?)
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना भाजप युती करताना ज्या प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी प्रयत्न केले. अशा नेत्यांच्यासोबत एकनाथ खडसेही होते. त्यामुळे यशाची शिखरे पादाक्रांत करत असताना पायाचे दगड का ठिसूळ होत आहेत. यावर विचार करण्याची भाजपला आवश्यकता आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले. मी मैत्री माणनारा आहे. मैत्री जपणारा आहे. त्यात भाजप आमचा जुना मित्रपक्ष आहे. त्यामुळे जुन्या मित्राला मित्राने सावधगिरीचा इशारा द्यायला हवा, असा टोलाही ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.
दरम्यान, राज्याचे बरेच पैसे केद्राकडे अडकून पडले आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यास मोठा अडथळा येत आहे. केंद्राकडे अडकलेले पैसे जर वेळेत मिळाले असते तर तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही एखादं पॅकेज जाहीर केले असते. सर्व सोंग आणता येते. परंतू पैशाचे सोंग आणता येतनाही. त्यामुळे सर्व गोष्टींचा विचार करुन निर्णय घ्यावा लागतो.तरीसुद्धा राज्यातील शेतकऱ्यांसाठी जे जे करता येईल ते ते सर्व केले जाईल. उगाच अश्वासनांची खैरात केली जाणार नाही, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वेळी सांगितले.