Jaysingrao Gaikwad Quits BJP: एकनथ खडसे, जयसिंगराव गायकवाड यांच्या राजीनाम्याने मराठवाड्यात भाजपची कोंडी? राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता
Eknath Khadse, Jaysingrao Gaikwad Quits BJP | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्यात महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार सत्तेत आल्यापासून राज्याच्या राजकारणामध्ये बरेच बदल पाहायला मिळत आहेत. भाजपच्या आक्रमक राजकारणात पायबंध घालण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असल्याचे दिसते. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश केला. त्यानंतर आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड (Jaysingrao Gaikwad) यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे ऐन पदवीधर निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला आहे. जयसिंगराव गायकवाड यांच्या भाजप सोडचिठ्ठीमुळे भाजपला केवळ पदवीधर निवडणुकीतच फटका बसणार नाही तर आगामी काळातील मराठवाड्यातील राजकारणही बदलण्याची शक्यता आहे.

कोण आहेत जयसिंगराव गायकवाड?

जयसिंगराव गायकवाड हे बीड येथून भाजप तिकीटावर तीन वेला खासदार राहिले आहेत. त्यांनी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री म्हणूनही कारभार पाहिला आहे. तसेच या आधी ते दोन वेळा विधानपरिषदेवरही निवडूण गेले आहेत. मात्र, गेल्या काही काळापसून (10 वर्षे) भाजपमध्ये त्यांची उपेक्षा केली जात होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भाजपसाठी काम कले. पक्ष बंधणी केली. आता पक्षाला चांगले दिवस आले तर काल परवा पक्षात आलेले किंवा मोठे झालेले लोक निर्णय घेऊ लागले आहेत, असा आरोप जयसिंगराव गायकवाड यांनी पक्ष सोडताना केला आहे. (हेही वाचा, Jaysingrao Gaikwad Quits BJP: मराठवाड्यात भाजपला मोठा धक्का; माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांची पक्षाला सोडचिठ्ठी)

जयसिंगराव गायकवाड कोठे स्थिरावरणार?

जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असली तरी पुढची रणनिती काय असेल हे मात्र त्यांनी अद्याप स्पष्ट केले नाही. आगामी काळात ते राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना पक्षात प्रवेश करु शकतात, अशी चर्चा आहे. दरम्यान, भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर बोलताना जयसिंगराव गायकवाड यांनी म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षात मी ज्येष्ठ नेता होतो. भाजपच्या आताच्या टीममध्ये असलेल्यांपैकी मला समजून सांगण्याची हिंमत कोणाच्यातच नाही. दीड दिवसात कोल्हे ऊसात असा हा सगळा प्रकार आहे. त्यामुळे मी भाजपा सोडत आहे. भाजपला मला जोरात आपटायचे आहे. ते खूप वर गेलेत. भाजप 50,60 हजार फुटांच्याही वर गेला आहे. त्यांना जमीनीवर आणण्यासाठी मला काम करायचा आहे. भाजपमध्ये वाव मिळत नसल्यानेच आपण पक्ष सोडण्याचा विचार केल्याचे जयसिंगराव गायकवाड यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Aurangabad Graduate Constituency Election: भाजपला धक्का, औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणुकीत राष्ट्रवादीचे डॅमेज कंट्रोल)

 भाजपला उत्तर महाराष्ट्रात मोठा फटका बसण्याची शक्यता

एकनाथ खडसे यांच्याप्रमाणेच जयसिंगराव गायकवाड हे उत्तर महाराष्ट्रातील नेते आहेत. ते भाजपचे जुने नेते कार्यकर्ते होते. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या काळापसून ते भाजप सोबत जोडलेले होते. मराठवाड्यात भाजपची पाळंमुळं घट्ट करण्यासाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यामुळे एकनाथ खडसे आणि जयसिंगराव गायकवाड यांच्यासारखे नेते पक्ष सोडून गेल्याने भाजपला उत्तर महाराष्ट्रात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर नाराज होत जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला नुकतीच सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राज्यात ओबीसी समूहाचे नेतृत्व करणारे तीन चेहरे भाजपकडे होते. त्यातील गोपीनाथ मुंडे यांचा चेहरा क्रमांक एकच होता. त्यानंतर एकनाथ खडसे आणि विनोद तावडे असे हे समिकरण होते. परंतू, आता गोपीनाथ मुंडे हायात नाहीत. त्यांच्या कन्या पंकजा मंडे यांचा विधनसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. तर विनोद तावडे यांना हरियाणाचे प्रभारीपद देण्यात आले आहे. त्यात विनोद तावडे यांचे कार्य विद्यार्थी परिषदेपुरते मर्यादित आहे. त्यामुळे त्यांना थेट जनाधार नसल्याचे मानले जात आहे. त्यामुळे भाजपला ओबिसी चेहरा देण्यासाठी नाव्या नावाचा शोध घ्यावा लागणार आहे.