BJP flags (Photo Credits: IANS)

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर माजी केंदीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड (Jaysingrao Gaikwad) यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे जयसिंगराव गायकवाड नाराज होते. यातच त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भाजपमध्ये उपेक्षा होत असल्यामुळे राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. आगामी निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे.

जयसिंगराव गायकवाड हे जनसंघापासून भाजपमध्ये कार्यरत होते. मराठवाड्यात पक्षाच्या विस्तारासाठी त्यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम केले आहे. जयसिंगराव यांनी राज्य मंत्रिमंडळात सहकार राज्यमंत्रिपद भूषवले होते. तसेच, केंद्रात शिक्षण व खाण राज्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली होती. या व्यतिरिक्त जयसिंगराव हे बीड लोकसभा मतदारसंघातून 3 वेळा खासदार झाले आहेत. तर, पदवीधर मतदारसंघात त्यांनी दोनदा विजय मिळवला आहे. सध्या ते भाजपच्या प्रदेश कार्यसमितीचे सदस्य होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांना सक्रिय राजकारणातून बाजूला फेकले गेले होते. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे नाराज झालेल्या जयसिंगराव गायकवाड यांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, आता जयसिंगराव यांनी हा उमेदवारी अर्ज मागे घेणार असले तरी त्यांनी पक्षालाच रामराम ठोकला आहे. हे देखील वाचा- NCP अध्यक्ष शरद पवार यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द, 'हे' आहे त्यामागचे कारण

एएनआयचे ट्वीट-

महाविकासआघाडीतील तीन पक्षांच्या ताकदीमुळे ही निवडणूक भाजपला अवघड जाणार आहे. जयसिंगराव गायकवाड मराठवाड्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. यामध्ये आता त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने मराठवाडा पदवीधर मतदारसंघामध्ये त्यांच्या जाण्याची किंमत भाजपला मोजावी लागू शकते.