Sharad Pawar | Photo Credits: Twitter/ ANI

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पक्ष प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा आयोजित करण्यात आला होता. मात्र काही कारणास्तव हा दौरा रद्द करण्यात आला आहे. हा दौरा का रद्द केला असावा अशी चर्चा सर्वत्र रंगत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे क्वारंटाईन असल्याने खबरदारी म्हणून हा दौरा रद्द केला आहे. एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशानंतरचा पहिला दौरा खूपच महत्वाचा मानला जात होता. त्यासाठी राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी देखील करण्यात आली होती. मात्र अचानक हा दौरा रद्द झाल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.

दरम्यान एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली. त्यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून रोहिणीच्या संपर्कात आलेल्या एकनाथ खडसे यांनी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेण्याचे ठरवले. त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा येत्या 20 आणि 21 नोव्हेंबरला होणारा उत्तर महाराष्ट्राचा दौरा रद्द करण्यात आला आहे.

शरद पवार येत्या 20 आणि 21 नोव्हेंबरला धुळ्यासह नंदूरबारला जाणार होते. यावेळी ते त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांशी संवाद साधणार होते. शरद पवारांच्या दौऱ्यानिमित्ताने राष्ट्रवादी पक्षाकडून जय्यत तयारीलाही सुरुवात करण्यात आली होती.हेदेखील वाचा- Amol Kolhe: 'श्रेय घेण्यापेक्षा खबरदारी घ्यावी' मंदीर उघडण्याचा श्रेयवादावरून अमोल कोल्हे यांचा भाजपला टोला

तसेच एकनाथ खडसेंसाठीही हा दौरा विशेष मानला जात होता. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून हा दौरा रद्द करण्यात आला आहे. तर दुसरीकडे रद्द झालेला हा दौरा लवकरच पुन्हा आयोजित केला जाईल असे सांगितले जात आहे. मात्र त्याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

भाजपला रामराम केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी मुलगी रोहिणी खडसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईत पार पडलेल्या या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि अन्य नेते उपस्थित होते.