Earthquake | Representational Image | (Photo Credits PTI)

देशातील अनेक राज्यात भूकंपाचे धक्के (Earthquake) बसण्याची मालिका सुरु असून मुंबईतही असेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईत आज सकाळी 8.00 च्या सुमारास पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिली आहे. आज सकाळी मुंबईच्या उत्तर दिशेला (North of Mumbai) 3.5 रिश्टेर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. मुंबई च्या उत्तर दिशेला सुमारे 102 किमी दूर 3.5 रिश्टल स्केलचा भूकंप झाला आहे. दरम्यान शनिवारी (5 सप्टेंबर) देखील मुंबईच्या उत्तर दिशेस 98 किमी अंतरावार 2.7 रिश्टेर स्केल तीव्रतेचा भूकंपाचे धक्के जाणवले होते. यासंदर्भात नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजी (National Centre for Seismology) ने माहिती दिली होती.

त्याआधी 4 सप्टेंबरला सुद्धा मुंबईच्या उत्तरेस 91 किमी अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले होते. मुंबईच्या सुरु असलेल्या या भूकंपाच्या मालिकांनी या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या भूंकपामुळे कोणतेही नुकसान झालेले नाही.

याशिवाय शुक्रवारी रात्री नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे दोन धक्के जाणवले. यातील पहिला धक्का रात्री 11 वाजून 11 मिनिटांनी नाशिकच्या पश्चिम बाजून 95 किलोमीटर अंतरावर जाणवला. या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल इतकी होती. तसेच दुसरा धक्का नाशिकच्या पश्चिम बाजूस 98 किलोमीटर अंतरावर 12 वाजून 5 मिनिटांनी जाणवला. या भूकंपाची तीव्रता 4.0 इतकी होती.

मागील महिन्यात पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात भूकंपाचे सहा सौम्य धक्के बसले होते. या सर्व भूकंपाचे केंद्रबिंदू डहाणू तालुक्याच्या परिसरात होते. तसेच केंद्रबिंदूची खोली पृष्ठभागापासून दहा किलोमीटर होती.