Sea Link | Photo Credits: Twitter/ Dr Shashank Joshi

मुंबई किनारपट्टी जवळून पुढे सरकणार्‍या तौक्ते चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) फटका आज मुंबईमध्ये प्रवासी सेवेला बसला आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे काल संध्याकाळपासूनच मुंबईत सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या सरी बरसण्यास सुरूवात झाली आहे. आजही हा जोर कायम राहणार असल्याने मुंबईत आज पालिकेने वांद्रे-वरळी सी लिंक (Bandra-Worli Sea Link) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर मुंबई एअरपोर्ट (Mumbai Airport) देखील 3 तास प्रवासासाठी बंद असेल. तर मध्य रेल्वे वर देखील झाडाची फांदी कोसळल्याने वाहतूक मंदावल्याची माहिती आहे. Mumbai Rains Update: मुंबईत काल रात्रीपासून सोसाट्याच्या वा-यासह पावसाची संततधार सुरुच, पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता-IMD.

दरम्यान मुंबई मध्ये आज पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, समुद्राला उधाण येण्याची शक्यता असल्याने वांद्रे- वरळी सी लिंक पुढील आदेशापर्यंत बंद ठेवला जाणार आहे. मुंबई पोलिसांनी नागरिकांना विनाकारण बाहेर न पडण्याचं आवाहन करत आज  वांद्रे- वरळी सी लिंक ऐवजी माहीम - शिवाजी पार्क - प्रभादेवी (सिद्धिविनायक मंदिर मार्ग) - हाजी अली जंक्शन, या मार्गाचा वापर करण्याचं आवाहन आहे. तर मुंबई एअरपोर्ट दुपारी 11 ते 2 या वेळेत बंद असेल. अशी माहिती MIAL ने दिली आहे. घाटकोपर- विक्रोळी भागामध्ये मध्य रेल्वेच्या ओवर हेड वायर वर फांदी पडल्याने त्याची वाहतूक देखील मंदावल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुंबईमध्ये वार्‍याचा वेग जास्त असल्याने अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडत आहेत. सकाळी वांद्रे येथील ठाकरे निवासस्थान 'मातोश्री' जवळ, जोगेश्वरी भागातही झाडं कोसळल्याने वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र तासाभरातच रस्ता मोकळा करून ट्र्फिकची समस्या दूर करण्यात आली आहे.