Mumbai Rains (Photo Credits: Twitter)

Mumbai Rains Update: देशात आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यासह मुंबईत वेगाने वारे वाहत आहेत. ज्याचा परिणाम काल रात्रीपासून सोसाट्याच्या वा-यासह मुंबईत पावसाला (Mumbai Rains) सुरुवात झाली. आजही सकाळपासून पावसाची संततधार सुरुच आहे. सुदैवाने पावसाला जास्त जोर नसल्याने मुंबईत कुठेही वॉटरलॉगिंगची समस्या निर्माण झाली नाही. मात्र सोसाट्याच्या वा-यामुळे चक्रीवादळाची चाहुल मात्र मुंबईकरांना जाणवत आहे. दरम्यान नागरिकांनी काळजी घ्या असे आवाहन मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी केले आहे.

मुंबईत काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरु असून पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.हेदेखील वाचा- Mumbai Vaccination Update: तौक्ते चक्रीवादळामुळे 17 मे रोजी मुंबईतील लसीकरण राहणार बंद

तौक्ते चक्रीवादळ मुंबईच्या उंबरठ्यावर असल्यामुळे नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असे आवाहन करण्यात आले आहे. चक्रीवादळाचा नागरिकांना फटका बसू नये म्हणून महापालिकेकडून आज देखील मुंबईत लसीकरण बंद असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईतील आयएमडी विभागाकडून तौक्ते चक्रीवादळ पुढील 24 तासात आणखी रौद्र रुप निर्माण करणार आहे. 18 मे रोजी सकाळी गुजरातला धडकणार असल्याची शक्यता आहे. त्यांनी असे म्हटले की, मुंबईत आज सुद्धा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. सोमवारी (17 मे) सुद्धा जोरात पाऊस पडणार असून 18 मे रोजी मध्यम पावसाची शक्यता आहे.