महाराष्ट्र: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात 2000 रुपयांत होणार सीटी स्कॅन
CT Scan Machine (Photo Credits; Wikimedia Commons)

महाराष्ट्रात दिवसागणिक कोरोना बाधितांची (COVID-19 Positive) संख्या वाढत असताना लोकांची त्वरित त्यावर उपचार करता यावा म्हणून त्या संबंधीच्या आरोग्य तपासण्या माफक दरात उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत होते. त्याचाच परिणाम आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांच्या पुढाकाराने आता राज्यात सीटी स्कॅन (CT Scan) करण्यासाठी केवळ 2000 रुपये मोजावे लागणार असल्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. कोरोना रुग्णांकरिता राज्य सरकारने सीटी स्कॅनच्या दरांवर नियंत्रण आणले आहे. यापुढे सीटी स्कॅनसाठी दोन ते तीन हजार रुपयांहून अधिक शुल्क आकारता येणार नाहीत असे सांगण्यात येत आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना संक्रमितांची संख्या वाढत असून यातील बहुतेक रुग्णांना छातीतील संसर्ग आणि न्युमोनियासाठी सीटी स्कॅन करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो. या सीटीस्कॅन साठी साडेतीन ते 7 हजार मोजावे लागतात. सर्वसामान्यांना ही रक्कम परवडण्यासारखी नसल्याने अनेकदा लोक यासाठी टाळाटाळ करतात. ज्याचे त्या व्यक्तीला पुढे जाऊन गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. म्हणूनच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकाराने आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. Coronavirus Update: भारतात मागील 11 दिवसांत 10 लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात- आरोग्य मंत्रालय

या समितीत सीटी स्कॅनसाठी नवे दर लागू करण्यात आले आहेत. ज्यात 16 ‘स्लाइस सीटी स्कॅन’साठी दोन हजार रुपये, 16 ते 64 ‘स्लाइस’ क्षमतेच्या मशीनद्वारे केलेल्या सीटी स्कॅनसाठी अडीच हजार रुपये, तर 64 ‘स्लाइस’साठी तीन हजार रुपये दर निश्चित केला आहे.

राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 13,21,176 इतकी झाली आहे. सध्या 2,69,119 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर काल दिवसभरात 23,644 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर भारतात कोरोना बाधितांची एकूण संख्या 60 लाख 74 हजार 703 वर (Coronavirus Positive Cases) पोहोचली आहे. यात केंद्र आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने (Health Ministry of India) माहितीनुसार देशात मागील 11 दिवसांत 10 लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 50 लाखाहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 50 लाख 16 हजार 521 वर (Coronavirus Recovered Cases) पोहोचली आहे.