पुणे: धुळवडीदरम्यान दोन गटात तुफान हाणामारी, रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांची तोडफोड
Fight Between Two Groups | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

Dhulivandan 2020: ऐन धुळवडीच्या दिवशी पुणे शहरात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. धुळवड (Dhulwad) खेळतानाच हा प्रकार घडल्याचे समजते. दोन्ही गटांतील समर्थक आमनेसामने आले आणि त्यांच्यात हाणामारीस सुरुवात झाली. या वेळी दोन्ही गटांकडून रस्त्यांवर उभ्या असलेल्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. दोन्ही गटांतील तरुणांनी हातात लाठ्या-काठ्या घेऊन एकमेकांचा पाटलाग केला. या वेळी काही प्रमाणात दगडफेकही करण्यात आली. हा प्रकार पुणे (Pune) शहरातील चतुःशृंगी (Chaturshringi) परिसरातील खैरेवाडी येथे घडला.

प्राप्त माहितीनुसार, चतुःशृंगी परिसरातील खैरेवाडी येथे धुळवड खेळत असताना दोन गटांमध्ये काही कारणांवरुन बाचाबाची झाली. किरकोळ बाचाबाचीचे रुपांतर मोठ्या भांडणात झाले. त्यानंतर दोन्ही गट एकमेकांवर धावून गेले आणि हाणामारीला सुरुवात झाली. भांडणास नेमकी कोणत्या कारणावरुन सुरुवात झाली हे मात्र समजू शकले नाही. हाणामारीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. (हेही वाचा, Happy Holi 2020: होळीच्या रंगाचे कपडे धुताना वापरा 'या' टिप्स; झटपट डाग निघायला होईल मदत)

घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. पोलींना घटनास्थळावरुन सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतल्याचे समजते. चतुःशृंगी पोलीसांना घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरु केला आहे. दरम्यान, घटना घडलेल्या परिसरात नागरिकांमध्ये अद्यापही भीतीचे वातावरण आहे.