'मोदीजी परळीत तुमचे स्वागत आहे!'; धनंजय मुंडे यांचे ट्विट
Dhananjay Munde | (Photo credit: Archived, edited, representative images)

Maharashtra Assembly Elections 2019: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करणारे ट्विट केले आहे. भाजप (BJP) उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे उद्या (17 ऑक्टोबर 2019) परळी येथे सभा घेत आहेत. या पार्श्वभूमीमीवर धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपला टोला लगावत ट्विट केले आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, “मोदीजी तुम्ही उद्या परळीत येताय तुमचे स्वागत!, पण एकच इच्छा आहे. परळीला येताना हेलिकॉप्टरऐवजी अंबाजोगाई रस्त्याने या. तुमच्या मंत्र्यांनी केलेला ‘विकास’ दिसेल. चंद्रयान-२ मोहिमेदरम्यान तुम्ही ४ तास थेट प्रक्षेपण पाहिले, प्रत्यक्ष अनुभव परळी-अंबाजोगाई प्रवासादरम्यान घ्या. शुभेच्छा!”

बिड जिल्हा आणि परळीतील रस्त्यांच्या दुरावस्थेकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष ट्विटरच्या माध्यमातून वेधून घेण्याचा धनंजय मुंडे यांचा प्रयत्न आहे.

धनंजय मुंडे ट्विट

मराठवाड्यात बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे राज्याचे लक्ष्य लागले आहे. भाजप उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्यातील सामना हा मराठवाड्याच्या राजकारणातील एक महत्त्वपूर्ण लढत आहे. दोघेही बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. दोघेही भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मंडे यांच्या राजकीय मार्गदर्शनाखाली वाढले आहेत. 2014 च्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या विरोधात पंकजा मुंडे या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. परळीतील जनता कोणाला साथ देते पाहणे उत्सुकतेचे आहे. (हेही वाचा, विधानसभा निवडणूक 2019: मराठवाडा कोणाचा? शिवसेना-भाजप युती गड राखणार की, काँग्रेस रष्ट्रवादी पुन्हा एकदा भाकरी फिरवणार?)

दरम्यान, या वेळी विधानसभा निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्रात 8 कोटी 94 लाख मतदार मतदान करतील. महाराष्ट्रात 288 मतारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 27 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 4 ऑक्टोबर हा निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम दिवस असेल. 7 ऑक्टोबर पर्यंत दाखल केलेले आणि छाननीमध्ये टिकलेले उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर 21 ऑक्टोबर या दिवशी प्रत्यक्ष मतदान तर, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.