OBC Reservation: ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
Devendra Fadnavis | (File Photo)

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज ओबीसी आरक्षणासंदर्भात (OBC Reservation) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अद्याप प्रलंबितच असल्यामुळे आता राज्य सरकारने यासंदर्भात 50 टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेच्या आधीन राहून ओबीसी आरक्षणाबाबत अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे. यावर भाजपच्या अनेक नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यातच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही यासदंर्भात भाष्य केले आहे.

नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारला हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. 13 डिसेंबर 2019 ला ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा सांगितले त्यावेळेस हा निर्णय घेणे आवश्यक होते. ज्यामुळे ओबीसीचे आरक्षण गेले नसते, अशा शब्दात फडणवीस यांनी राज्य सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. तसेच सरकारने अध्यादेश काढण्याचा उशिरा घेतलेला निर्णय असला तरी योग्य निर्णय आहे. मात्र, एवढा निर्णय करून हा प्रश्न सुटणार नाही. हा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाकडून रिपोर्ट घ्यावा लागेल. तर सुप्रीम कोर्टाने सांगितलेली ट्रिपल टेस्ट आपण पास करू शकतो, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- Jalna Sucide Case: मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने जालन्यातील सदाशिव भुंबर या तरूणाने केली आत्महत्या

ओबीसी आरक्षणाचा मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण पेटले होते. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत, असे स्पष्ट केले. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तारीख जाहीर केली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छगन भुजबळ यांनी यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.