Devendra Fadnavis | (Photo Credits: Facebook)

बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Election) भारतीय जनता पक्षाला (Bharatiya Janata Party) एनडीएचे (NDA) सरकार राखण्यात यश आलं. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या जनता दल संयुक्तपेक्षा भाजपने अधिक जागा पटकावल्या. दरम्यान, या निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रभारी पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील सत्तांतरावर भाष्य केलं आहे.

राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार अशी टीका टिपण्णी वारंवार विरोधकांकडून होत असते. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तांतर हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. यावर बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आम्ही राज्यातल्या सत्तांतराकडे नजर ठेऊन बसलेलो नाही. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार एक दिवस स्वतःच्याच ओझ्याने कोलमडून पडेल. कारण असे सरकार फार काळ टिकत नाही. ज्या दिवशी हे सरकार कोसळून पडेल त्या दिवशी आम्ही पर्यायी सरकार देऊ."

ANI Tweet:

बिहार निवडणूकीतील भाजपच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी बिहारच्या जनतेचे आभार मानण्यासाठी खास ट्विट केले होते. त्यात त्यांनी बिहार मधील जनतेला जंगलराज नाही तर विकास हवा असल्याचे म्हटले होते. हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा आणि नीतीश कुमार यांच्या विश्वासाचा असल्याचेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, 243 जागांसाठी झालेल्या बिहार विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपला 74, जेडीयूला 43 आणि इतर मित्रपक्षांना 8 जागा मिळाल्या. त्यामुळे एकूण 124 जागांवर विजय मिळवल्याने एनडीएचा सत्तास्थपानेचा मार्ग मोकळा झाला आहे. तर एनडीएला तगडे आव्हान देणाऱ्या महागठबंधनला 110 जागा मिळाल्या. विशेष म्हणजे तेजस्वी यादव यांच्या राजदला सर्वाधिक जागा 75 मिळाल्या आहेत.