शिवसेना आणि भाजप पक्षात थेट संवाद होत नसला तरी दोन्ही पक्ष मीडियाच्या माध्यमातून आपापला संदेश एकमेकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. शिवसेनेच्या वतीने संजय राऊत पक्षाची भूमिका मांडत आहेत तर भाजपतर्फे सुधीर मुनगंटीवार व चंद्रकांत पाटील पक्षाची भूमिका स्पष्ट करत आहेत.
अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आज स्वतःहून उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असल्याचे वृत्त आज तक या वाहिनीने दिली आहे. संभाजी भिडे यांनी मातोश्रीवर भेट घेण्यास येण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याचे आज तक ने म्हटले आहे. तसेच गेल्या आठवड्याभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना तब्बल तीनवेळा फोन केला असून उद्धव ठाकरेंकडून मात्र एकदाही फोनचे उत्तर देण्यात आलेले नाही.
देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा पहिल्यांदा उद्धव ठाकरेंना कॉल केला तेव्हा ते दुसऱ्या कॉलवर व्यस्त असल्याचे सांगण्यात आले, तर दुसऱ्यावेळी उद्धव ठाकरे विश्रांती घेत असल्याचे सांगितले गेले. परंतु तिसऱ्यांदा कॉल केल्यावर मात्र उद्धव ठाकरे स्वत: फोन करतील असं उत्तर देण्यात आलं.
शिवसेना अद्यापही त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या मागणीवर कायम असल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाजप काय निर्णय घेईल हे लवकरच बघायला मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 4.30 वाजता पतर्कार परिषद बोलावली आहे.