कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi 2020) निमित्त महाराष्ट्रात भाविकांमध्ये एकच उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र कोरोनाचे सावट अजून पूर्णपणे हटले नसल्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा हा उत्सव साजरा करता येणार नाही. त्यातच आता गेल्या महिन्याभरापासून कमी झालेल्या कोरोना बाधितांची संख्या आता पुन्हा वाढू लागल्यामुळे देहूतील (Dehu) संत तुकारामांचे मंदिर (Sant Tukaram) बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती मंदिराच्या विश्वस्तांनी दिली आहे. कार्तिकी एकादशी निमित्ताने या मंदिरात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
मार्च महिन्यापासून महाराष्ट्रातील अनेक मंदिरे आणि प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात आली होती. मात्र 16 नोव्हेंबरपासून ही प्रार्थनास्थळे हळूहळू सुरु करण्यात आली. मात्र आता कोरोनाचा प्रार्दुभाव पुन्हा वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे देहू येथील संत तुकारामांचे मंदिर 25 ते 26 नोव्हेंबरदरम्यान बंद राहणार आहे. हेदेखील वाचा- Diwali 2020: दिवाळी पाडवा आणि भाऊबीज निमित्त पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची सुंदर सजावट (Watch Video)
दरम्यान पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीच्या काळात संचारबंदी लागू केली जाणार आहे. प्रार्थनास्थळे खुली झाली खरी मात्र आता पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा पुन्हा सज्ज झाली असून खबरदारीच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेतली जात आहे. देहूतील संत तुकोबांचे मंदिर बंद असल्याने भाविकांनी देहूमध्ये गर्दी करू नये, असं आवाहन संस्थानाकडून करण्यात आलं आहे.
दरम्यान कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार पंढरपूरात मर्यादित संख्येतील वारकऱ्यांच्या उपस्थितीत कार्तिकी वारी परंपरा यशस्वी व्हावी, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. विधानभवन येथे वारीदरम्यान येणाऱ्या समस्या आणि कोरोना पार्श्वभूमीवर वारीचे नियोजन करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे यंदाची पंढरपूर कार्तिकी वारीही अशीच साजरी होणार आहे.