डेक्कन क्वीन ची डायनिंग कार प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज; लवकरच होणार दाखल
Deccan Queen Photo Credit: Wiki Commons

'दख्खनची राणी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या डेक्कन क्वीन (Deccan Queen) आता नव्या रुपात आपल्यासमोर येत आहे. रुप म्हणजे या गाडीचे बाह्यरुप तेच राहणार असून त्यात डायनिंग कार कोच लवकरच सुरु करण्यात येणार आहे. एकाचवेळी 40 प्रवासी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकतील, अशी प्रशस्त कार सज्ज झाली आहे. पुढील काही दिवसांत ही कार प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. पॅन्ट्रीसह डायनिंग कार असलेली ही एकमेव प्रवासी गाडी आहे.

जून 2019 मध्ये या गाडीने 90 वर्षे पूर्ण केली. रेल्वेच्या शिरपेचात मानाचा तुरा असलेल्या डेक्कन क्वीनला प्रवाशांची नेहमीच पसंती असते. ही देशातील एकमेव अशी गाडी आहे ज्यात डायनिंग कारची सुविधा देण्यात आली आहे. आता ह्यात थोडा बदल करुन आधुनिक सोयी सुवधा असलेली नवीन डायनिंग कार सुरु करण्यात येणार आहे. त्याशिवाय या गाडीला एलएचबी डब्बे दिल्याने दोन्ही बाजूला इंजिन मिळाल्याने घाटातील वेळ वाचणार आहे. Deccan Queen: डेक्कन रेल्वेच्या डायनिंग कारच्या जागी येणार प्रवासी कोच?

त्याशिवाय या गाडीचा वेगही वाढेल. तसेच या गाडीला पुलपुश तंत्रज्ञानाचा देखील फायदा होणार आहे. या गाडीच्या डब्ब्यांच्या रंगामुळे या रेल्वेला विशेष ओळख आहे, त्यामुळे हा रंग न बदलता या रेल्वेमध्ये हे आधुनिक बदल करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

काही महिन्यांपूर्वी ही डायनिंग कार काढून टाकण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र प्रवाशांच्या आग्रहास्तव ही डायनिंग कार पुन्हा सुरु करण्यात येत आहे.