Cyclone Maha Update: महा चक्रीवादळ (Cyclone Maha) आणि त्यामुळे निर्माण झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमिवर पालघर (Palghar) जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच, मच्छिमारांना समुद्रात न उतरण्याचे तसेच, नागरिकांना सतर्क राहण्याचे अवाहन करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयं 6 ते 8 नोव्हेंबर या काळात बंद ( Holidays to schools, colleges in Palghar) राहतील. पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, चक्रिवादळामुळे जिल्ह्यात कोसळू शकणाऱ्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा संभाव्य धोका विचारात घेऊन प्रशासन सतर्क झाले आहे. गरज पडल्यास मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी कोणतीही कमतरता भासू नये यासाठी पालिका, महसूल, आरोग्य, वैद्यकीय पथक, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर सर्व यंत्रणाच्या अधिकारी- कर्मचारी वर्गाने मुख्यालयात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, संभाव्य धोका विचारात घेऊन रजेवर असणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, त्यांना तातडीने कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बुधवारी रात्री किंवा गुरुवारी (7 नोव्हेंबर 2019) पहाटेच्या सुमारास गुजरातमधील पोरबंदर आणि दीव दमन समुद्र किनाऱ्यावर महा चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. वादळाचा संभाव्य धोका विचारात घेऊन संमुद्र किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हे वादळ जरी गुजरातला धडकणार असले तरी, त्याचा ठाणे आणि पालघर जिल्ह्याला मोठा फटका बसू शकतो. हे वादळाचे वारे ताशी 100 ते 120 किलोमीटर इतक्या वेगाने वाहणार आहे. त्यामुळे ठाणे, पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Cyclone Maha Update: अरबी समुद्रात 'महा' चक्रीवादळ, पालघर, ठाणे परिसरात उद्या मुसळधार पावसाची शक्यता)
दरम्यान, महा चक्रीवादळामुळे केवळ ठाणे, पालघरच नव्हे तर रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदूरबार, नगर, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद आणि सातारा जिल्ह्यातही वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यत आहे. या जिल्ह्यांसोबतच हिंगोली, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे.