मुंबई: CSMT ते ठाणे सुरु झाली पहिली ट्रेन; जाणून घ्या इतिहास
Train | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Indian Rail History: लॉकडाऊन असल्यामुळे देशभरातील प्रवासी रेल्वे वाहतूक आज ठप्प आहे. परिणामी देशभरातील नागरिक ठिकठिकाणी अडकून पडले आहे. जवळपास देशच ठप्प झाल्याचे चित्र. यावरुन भारतीय दळणवळण ट्रेन किती महत्त्वाची याची प्रचिती येते. भारतीय रेल्वे या विषयावर बोलायचे तर आजचा दिवस खास आहे. आज 16 एप्रिल. सन 2020 मधील 106 वा दिवस. कारम आजच्याच दिवशी म्हणजेच 16 एप्रिल 1853 या दिवशी भारतातील पहिली रेल्वे सुरु झाली. ब्रिटीशांचा काळ होता तो. त्या काळात या दिवशी मुंबई (तेव्हाची बॉम्बे) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते ठाणे (CSMT to Thane) अशी पहिली ट्रेन धावली. ट्रेन कसली झुक झुक गाडीच ती. आजची सीएसएमटी (CSMT) तेव्हा बोरी बंदर (Bori Bunder) स्टेशन होते. भारतातील पहिल्या ट्रेनमधून तेव्हा सुमारे 400 नागरिकांनी प्रवास केला. हा प्रवास सुमारे 34 किलोमीटर दूर अंतरावर पसरलेल्या रेल्वे रुळावरुन झाला.

मुंबई रेल्वे विस्तार

दरम्यान, एकेकाळी सीएसएमटी ते ठाणे अशी असलेली रेल्वे आज प्रचंड विस्तारली आहे. तिचा भारतभर विस्तार तर झाला आहेच. परंतू, मुंबईतही मोठा विस्तार झाला आहे. सीएसएमटी ते ठाणे अशी मुख्य रेल्वे असलेला हा मार्ग आता मध्य रेल्वे किंवा सेंट्रल रल्वे म्हणून ओळखला जातो. हा मार्ग आता सीएसएमटी ते कल्याण आणी पुढे कर्जत, खोपोली आणि कसारा तर सीएसएमटीवरुन हार्बर मार्गे पनवेल. तसेच चर्चगेट ते डहाणू असा विस्तार करण्यात आला आहे. मध्येच ठाणे ते पनवेल, वाशी अशी ट्रान्स हार्बर लाईनही आहे. शिवाय मेट्रो आणि मोनो ट्रेनही आहेत. असा हा मुंबई रेल्वेचा विस्तार झाला आहे. (हेही वाचा, Coronavirus: कोरोना व्हायरस आणि Lockdown काळात प्रवास करताना काय काळजी घ्याल?)

भारतातील पहिली हेरिटेज आणि टॉय ट्रेन

पुढे भारतीय रेल्वे केवळ इतक्यावरच थांबली नाही. पुढे भारतीय रेल्वे सेवा विस्तारत गेली. त्यात विविध विभागांसाठी खास रेल्वे गाड्याही सुरु करण्यात आल्या. जसे की, हेरिटेज आणि टॉय ट्रेन. भारतातील पहिल्या हेरिटेज ट्रेनचे नाव 'फेयरी क्वीन' असे होते. या ट्रेनचे वैशिष्ट्य म्हणजे या ट्रेनला जगातील सर्वात जुने आणि वाफेवर चालणारे इंजिन जोडण्यात आले होते. हे इंजिन ब्रिटीश किटसन कंपनी ने 1855 मध्ये तयार केले होते. पुढे 1977 मध्ये हीच ट्रेन हेरिटेज ट्रेन म्हणून चालवण्यात येऊ लागली.

दरम्यान, स्वातंत्र्यानंतर रेल्वेचेही विभाजन झाले. हे विभाजन भारत आणि पाकिस्तान असे होते. 14 ऑगस्ट 1947 या दिवशी हे रेल्वे नेटवर्क विभाजित करण्यात आले. पुढे अवघ्या चार वर्षातच म्हणजे 1951 मध्ये भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. आज भारतीय रेल्वेमध्ये तब्बल 14 लाख कर्मचारी असल्याचे सांगण्यात येते. भारतीय रेल्वे ही जगभरात सर्वात अधिक रोजगार देणारी रेल्वे सेवा म्हणून ओळखली जाते.