Cryptocurrency Fraud: नागपुरात क्रिप्टोकरन्सीच्या नावावर 2000 लोकांची तब्बल 40 कोटींची फसवणूक; 11 लोकांना अटक 
Cryptocurrency (Photo Credits-Twitter)

क्रिप्टोकरन्सीच्या फसवणुकीबाबत (Cryptocurrency Fraud) एक मोठे प्रकरण समोर आले आहे. नागपुरातील (Nagpur) क्रिप्टोकरन्सी फसवणूक प्रकरणात 2,000 गुंतवणूकदारांची 40 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी रविवारी सात जणांना अटक करण्यात आली असून, अटक झालेल्यांची एकूण संख्या 11 झाली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. एक दिवसापूर्वी या प्रकरणातील मुख्य आरोपी, त्याची पत्नी आणि दोन साथीदारांना पुण्यातील लोणावळा येथून अटक करण्यात आली होती.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘यातील मुख्य आरोपी निशिद वासनिक हा आपली भव्य जीवनशैली दाखवून लोकांना कंपनीत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करत होता. त्यांनी 2017 आणि 2021 दरम्यान लोकांची फसवणूक करून आपल्या खात्यात पैसे हस्तांतरित केले. गुंतवणुकीच्या मूल्यात सतत वाढ दर्शवण्यासाठी कंपनीच्या वेबसाइटवर फेरफार केली.’ त्यांनी मध्य प्रदेशातील पचमढी येथे क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीवर चर्चासत्रही आयोजित केले होते.

वासनिक हा गेल्या वर्षी मार्चमध्ये अचानक गायब झाल्याने गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले होते. त्याला शनिवारी पुणे जिल्ह्यातून अटक करण्यात आली. यशोधरा नगर पोलिसांनी रविवारी अटक केलेल्या सात जणांसह सर्व 11 आरोपींविरुद्ध आयपीसी, महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स ऍक्ट आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींनी इथर ट्रेड एशिया नावाची ऑनलाइन कंपनी स्थापन केली होती. डिजिटल क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करून कमी वेळात अधिक नफा मिळवून देण्याचे लालच त्यांनी दाखवले आणि याला भुलून 2 हजारांहून अधिक गुंतवणूकदार सामील झाले. त्यांची सुमारे 40 कोटींची फसवणूक करून आरोपी फरार झाले होते. त्यांनी टोळीतील एका साथीदाराची गोळी झाडून हत्याही केली आहे. याप्रकरणी नीलेश मोहाडीकर यांच्या फिर्यादीवरून 2021 मध्ये यशोधरा नगर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. (हेही वाचा: बिटकॉइनवर शिक्षकाची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला बेंगळुरूमधून अटक, गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याच्या बहाण्याने माटुंगातील महिलेला 2.47 लाखांचा गंडा)

गेले अनेक महिने पोलीस आरोपींचा शोध घेत होते. अशात आरोपी लोणावळा येथे असल्याची माहिती मिळाली. आरोपीला पकडण्यापूर्वी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर छापा टाकून आरोपींना अटक करण्यात आली व त्यांना नागपुरात आणून न्यायालयात हजर करण्यात आले.