पुणे: दाम्पत्याकडून तब्बल दिड कोटी रुपयांची ब्राउन शुगर जप्त, गुन्हे शाखेची कारवाई
Crime branch of Pune | (Photo Credits: ANI//Twitter)

मुंबई येथील सायन परिसरातून शहरात दाखल झालेल्या एका दाम्पत्याकडून पुणे पोलिसांनी तब्बल दीड किलो ब्राउन शुगर (Brown Sugar) जप्त केली आहे. सेल्वम नरेशन देवेंदर (वय ५७), वासंती चिनू देवेंदर (५७, रा. दोघेही-सायन कोळीवाडा, मुंबई) असे या दाम्पत्याचे नाव आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा (Crime branch of Pune) विभागाने कारवाई करत या दाम्पत्याला ताब्यात घेतले आहे.. या शुगरची किंमत 70 लाख रुपये असल्याचे सांगितले जात असले तरी, आंतरराष्ट्रीय बाजारात या शुगरची किंमत तब्बल 1 कोटी 60 लाख रुपये इतकी असल्याचे समजते. राज्यभरात निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अनेक ठिकाणी मोठमोठ्या रकमा पोलिसांच्या हाती लागत आहेत. परंतू, या रकमांसोबत आता अंमली पदार्थही पोलिसांच्या हाती लागल्याने निवडणुकीत अशा पदार्थांचाही वापर केला जात आहे काय? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

सेल्वम नरेशन देवेंदर, वासंती चिनू देवेंदर या दोघांविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुणे शहरात केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या दाम्पत्याकडे ही शुगर नेमकी आली कोठून? पुण्यात ते नेमके कोणाकडे निघाले होते. कोणाला विकणार होते की त्याचा इतर काही कारणांसाठी वापर करणार होते याबाबत तपास सुरु असल्याची माहिती पुण्याचे पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे व गुन्हे शाखेचे उपायुक्त बच्चन सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथील चांदणी चौक येथील कोथरुड कट्टा हॉलेल समोर एक महिला आणि एक पुरुष संषयास्पदरित्या फिरत होते. त्या दोघांचे वर्तन पाहून पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना हटकले. पोलिसांनी हटकताच दोघेही घाईघाईने काढता पाय घेत होते. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. त्यामुळे पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. दोघांचीही अंगझडती घेतली असता सेल्वेम याच्याकडे असलेल्या पिशवीत एक 1 किलो. तर, वासंतीकडे असलेल्या पिशवीत 540 ग्रॅम इतकी ब्राउन शुगर सापडली. (हेही वाचा, मुंबईमध्ये अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या नायजेरियन टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई; डोंगरी पोलिसांचे यश)

एएनआय ट्विट

गुन्हे शाखा युनीट तीनच्या पथकातील निरीक्षक राजेंद्र मोकाळी, उपनिरीक्षक संजय गायकवाड, संदीप तळेकर, विल्सन डिसोझा, सचिन गायकवाड, प्रवीण तापकीर हे गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात पोलीस गस्त वाढविण्यात आली आहे.