मुंबईमध्ये ड्रग्स आणि अंमली पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या नायजेरियन टोळीचा डोंगरी पोलिसांनी (Dongri Police) पर्दाफाश केला आहे. यात चार नायजेरियन ड्रग्जमाफियांना अटक केली असून, त्यांच्यावर थेट ‘मोक्का’अन्वये कारवाई केली आहे. एमडी, कोकेन, चरसची तस्करी तसेच पोलिसांवर हल्ला असे आरोप या टोळीवर आहेत. राज्यातील ही पहिलीच कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले. डोंगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाडीबंदर परिसरात नायजेरिअन अमली पदार्थ विक्रेत्यांचा अड्डा होता. या अड्ड्यावर अनेक अंमली पदार्थांची विक्री होत होती.
याआधी पोलिसांनी अनेकवेळा या टोळीला पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रत्येकवेळी पोलिसांवर हल्ला करून, दगडफेक करून ते पळून जायचे. एका प्रसंगी गोळीबारही करण्यात आला. या पार्श्वभूमीवर साहाय्यक आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांनी या तस्करांवर ‘मोक्का’अन्वये कारवाईसाठी पुढाकार घेतला. त्यानंतर पोलीस पथकाने 22 फेब्रुवारी रोजी धडक कारवाई करीत तिघा आफ्रिकन माफियांना पाच लाखांच्या एमडीसह रंगेहाथ पकडले होते. 27 तारखेला यांच्या चौथ्या साथीदारालाही पकडण्यात आले. (हेही वाचा: Drugs Racket चालविणारे 14 नायजेरियन तरुण पोलिसांकडून गजाआड)
यापैकी इक्यू इमॅन्युअल हा या टोळीचा प्रमुख असल्याची माहिती मिळाली. त्याच्याविरोधात अमली पदार्थ विक्रीचे दोन गुन्हे दाखल होते. तसेच त्या गुन्ह्य़ात आरोपपत्रही दाखल होते. याच गोष्टीच्या आधारे त्यांच्यावर ‘मोक्का’ अन्वये कारवाई केली. त्या चौघा ड्रग्जमाफियांना मोक्का कोर्टात हजर केले असता त्यांना 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ‘मोक्का’न्वये दाखल गुन्ह्य़ात आरोपीला जामीन मिळवणे अशक्य ठरते. खटल्याच्या निकालापर्यंत आरोपींना कारागृहात बंदिस्त राहावे लागते.