पुणे: ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू; शहरातील Covid 19  मुळे बळींचा आकडा 10 वर
Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

मुंबई पाठोपाठ आता पुणे शहरामध्येही कोरोना व्हायरसचा विळखा घट्ट होत आहे. आज सकाळी पुणे शहरात ससून जनरल हॉस्पिटलमध्ये (Sassoon General Hospital ) एकाचा बळी गेल्याने आता मृतांचा आकडा पुणे शहरामध्ये 10 वर पोहचला आहे. ससून रूग्णालयातील कोरोनाबाधित रूग्णाला कोरोना व्हायरसच्या संसर्गासोबतच अन्य गुंतागुंतीच्या आजाराचा देखील धोका होता. त्यामुळे उपचारादरम्यान संबंधित रूग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पुण्यामध्ये कोरोनाबाधिताचा आकडा 151 च्या वर पोहचला आहे तर एकूण 8 जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांनी देखील काल 1000 चा टप्पा पार केला आहे. आज सकाळी कोरोना व्हायरस बाधित एका 44 वर्षीय व्यक्तीचा पुणे येथे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात वाढती कोरोनाबाधितांची संख्या आणि त्यासोबत वाढणारा मृत्यूदर यांच्याबाबत काही दिवसांपूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली होती. दरम्यान मुंबई, पुणे शहरात वाढती रूग्णसंख्या आरोग्ययंत्रणेवरही भार वाढवत असल्याने नागरिकांना अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काल पुणे शहरामध्येही काही भागांत कर्फ्यूचे नियम कडक करत नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी विशिष्ट वेळ पाळण्याची बंधनं घालण्यात आली आहेत. Coronavirus: पुण्यातील अनेक भागात संचारबंदी झाली कडक; दुकाने फक्त दोन तासच सुरु राहणार, मास्कशिवाय बाहेर फिरण्यास मनाई.  

PTI Tweet

भारतामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण महाराष्ट्र राज्यात आहेत. काल रात्री दिवसभरात 150 रूग्ण वाढल्याने राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1018 पर्यंत पोहचला असून त्यापैकी 64 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 79 लोकं कोरोनामुक्त देखील झाले आहेत.  तर आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आता देशातील कोरोनाबाधितांचा आकडा  5194 वर पोहचला आहे.