Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

पुणे (Pune) शहरात कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग झाल्याचे पाच रुग्ण सापडले आहेत. या पाच रुग्णांपैकी एक व्यक्ती हा सोलापूर (Solapur) येथील रहिवासी आहे. या रहिवाशाच्या सोलापूर येथील कुटुंबीयांवर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोरोना व्हायरस संक्रमण होण्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी राज्य सरकारकडून नागरिकांसाठी विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यात कोरोना व्हायरस संक्रमीत व्यक्तीपासून दूर राहा, हस्तांदोलन टाळा आदी बाबींचा समावेश आहे. मात्र, आता कोरोना पीडित व्यक्तीच्या कुटुंबीयांनाच बहिष्कृत करुन त्यांना वाळीत टाकण्याचा प्रयत्न गावकऱ्यांकडून केला जातो आहे. या प्रकारावर राज्य सरकार काय कारवाई करणार किंवा काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

लोकसत्ता डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, 'तुमच्या घरातील एका व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तुमच्यामुळे आम्हालाही हा आजार होईल. त्यामुळे तुम्ही गाव सोडून जा' असे म्हणत गावकरी पीडिताच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास देत आहेत. या प्रकारामुळे सरकारसमोरही मोठे आव्हान नर्माण झाले आहे. एका बाजूला कोरोना व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करतानाच समाजातील सलोखा कायम ठेवण्याचेही मोठे आव्हान राज्य सरकारसमोर असणार आहे.

कोरोना व्हायरस पीडित रुग्णाच्या नातेवाईकांनी म्हटले आहे की, पुणे येथे कोरोना व्हायरस पीडित जे पाच रुग्ण आढलले आहेत. त्यात आमच्या कुटुंबातील एका व्यक्तीचा समावेश आहे. प्रसारमाध्यमांनी या रुग्णांच्या बातम्या देताना त्यांच्या नाव आणि गावांसहीत दिल्या. त्यामुळे रुग्णांची नावे जाहीर झाली. ती पाहून काही लोक आमची विचारपूस करण्यासाठी आले. तर, काहींनी चक्क तुम्ही गावच सोडून जा. तुमच्यामुळे आम्हालाही हा आजार होईल, असा सल्ला दिला. या प्रकाराबाबत पीडित कुटुंबीयांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याचेही समजते. (हेही वाचा, कर्नाटक: Coronavirus संक्रमण झाल्याचा संशय असलेल्या व्यक्तीचा मृत्यू; COVID-19 चा भारतातील पहिलाच बळी असल्याची चर्चा)

भारतामध्येही महाराष्ट्र, दिल्ली आणि राजस्थानमध्ये कोरोना व्हायरसग्रस्त नागरिकांची संख्या वाढताना दिसत आहे. देशभरातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आता 60 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी ही माहिती दिली. केंद्रीय मंत्रालयाने म्हटले आहे की, कर्नाटक आणि महाराष्ट्रात कोविड-19 (कोरोना व्हायरस) बाधित रुग्णांची संख्या अनुक्रमे पाच आणि दोन इतकी आहे. लद्दाख येथे 2, तर राजस्थान, तेलंगाना, तमिलनाडु, जम्मू-कश्मीर आणि पंजाब येथेही प्रत्येकी एक, केरळमध्ये 9 जणांना कोरोना व्हायरसची बाधा झाल्याची ताजी माहिती आहे.