राज्यातील कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच लसींचा अपुरा साठा ही मोठी समस्या राज्यापुढे आहे. आज 1 मे पासून राज्यातील 18-44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरु झाले. मात्र लसींचा अपुरा साठा यामुळे अनेक मर्यादा येत आहेत. अशीच परिस्थिती पुणे शहरातही निर्माण झाल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Pune Mayor Murlidhar Mohol) यांनी सांगितले आहे. लसींच्या मर्यादीत साठ्यामुळे 45 वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण दोन दिवस बंद ठेवावे लागत आहेत. त्याचबरोबर 18-44 वयोगटातील व्यक्तींसाठीही अत्यंत कमी लसी उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.
एएनआय (ANI) वृत्तसंस्थेशी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, "45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण आज आणि उद्या बंद राहणार आहे. आमच्याकडे त्यांच्यासाठी लसी उपलब्ध नाहीत. उद्या किंवा परवा आम्हाला लसी मिळतील, अशी आशा आहे. आमच्याकडे 18-44 वयोगटातील 20 लाखांहून अधिक लोक आहेत. परंतु, आमच्याकडे केवळ 7 दिवस पुरेल इतक्याच 5000 लसी राज्य सरकारकडून मिळाल्या आहेत. त्यामुळे इतक्या कमी साठ्यात लसीकरण कसे करायचे हा आमच्या समोर प्रश्न आहे." (Coronavirus In Pune: पुण्यातील हृदयद्रावक घटना! कोरोनाने अवघ्या 15 दिवसात एकाच कुटुंबातील 5 जणांचा घेतला बळी)
ANI Tweet:
Vaccination centers for 45 yrs and above remained close today and will remain shut tomorrow. We don't have vaccines for them. We're hoping to get the vaccines tomorrow or by day after. But for 18 yrs and above we don't have any information as of now: Pune Mayor, Murlidhar Mohol
— ANI (@ANI) May 1, 2021
राज्यातील मुंबई, पुणे येथे कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. कालच्या अपडेटनुसार, पुणे जिल्ह्यात 9,760 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 152 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 9,822 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.