महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Second Wave of Coronavirus) येण्याची शक्यता आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील (Dr. Archana Patil) यांनी वर्तवली आहे. याची माहिती त्यांनी सर्व जिल्हा रूग्णालय, सरकारी रूग्णालयातील कार्यरत डॉक्टर व सर्जन आणि सर्व जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिली आहे. या पत्रात त्यांनी सर्व आरोग्यसेवकांना कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यापासून कोरोना बाधितांच्या संख्येत झालेली घट पाहता परिस्थिती नियंत्रणात आल्याचे चित्र निर्माण झाले होते.
कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमुळे युरोपीयन देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य आरोग्य विभागाने सर्व जिल्हा रुग्णालयांना कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण होणारी गंभीर परिस्थिती हातळण्यासाठी सज्ज आणि सतर्क राहण्यास सांगितले आहे. (Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात दिवाळीच्या वेळी पुन्हा वाढू शकते कोरोना विषाणू संक्रमितांची संख्या; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा)
आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले की, कोरोनाच्या चाचण्या करणे कोणत्याही परिस्थितीत थांबता कामा नये. दर दिवशी 10 लाख लोकसंख्येमागे 140 चाचण्या करण्यात याव्या. Influenza सारख्या आजाराचा संकेत मिळवण्यासाठी सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील फिव्हर क्लिनिकल्सने या विषयी डेली रिपोर्ट ठेवला पाहिजे. त्यामुळे अधिकाऱ्यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास मदत होईल.
दररोज अनेक लोकांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना सरकारने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहे. राज्यात अशा लोकांना 'सुपर स्प्रेडर' असे संबोधले गेले आहे. कोविडची दुसरी लाट आल्यास सुपर स्प्रेडर्स त्या लाटेत अधिक योगदान देतात. म्हणून त्यांचे आरोग्य परीक्षण करणे आवश्यक आहे. शासनाने पीएसएसचे खालील श्रेणीमध्ये वर्गीकरण केले आहे:
छोटे व्यापारी: किराणा दुकानात काम करणारे लोक, हॉटेल, रेस्टॉरंट्स, भाजीपाला-फळ विक्रेते, हॉटेल मालक.
होम सर्व्हिस विक्रेते: न्यूज पेपर विक्रेते, घरातील मदतनीस, कामवाली बाई, गॅस सिलेंडर डिलिव्हरी मेन, लॉन्ड्रीमेन, प्लंबर, इत्यादी.
परिवहन सेवेशी संबंधित लोक: ट्रक ड्रायव्हर्स, टेम्पो ड्रायव्हर्स, ऑटो ड्रायव्हर्स, सार्वजनिक क्षेत्रातील वाहतुकीतील कंडक्टर आणि ड्रायव्हर.
कामगार: बांधकाम कामगार, गृहनिर्माण संस्थांचे सुरक्षा कर्मचारी, पोलिस, होमगार्ड्स, शासकीय क्षेत्रातील आपत्कालीन सेवांमध्ये काम करणारे लोक आणि बिगर सरकारी क्षेत्रातील लोक.
दररोज, या सर्व लोकांच्या चाचण्या करुन त्याचे लॅबमध्ये परिक्षण करणे गरजेचे आहे.
उपचारांच्या सूचना देताना आरोग्य संचालक म्हणाले आहेत की, "सध्या ग्रामीण आणि शहरी क्षेत्रातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहेत. त्यामुळेच कोरोनाची लागण झालेले आणि न झालेल्यांवर देखील उपचार होणे आवश्यक आहे. म्हणूनच ग्रामीण व शहरी भागातील जिल्हा रुग्णालयांनी उपचाराची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. कोविड सेंटर म्हणून सुपर स्पेशालिटी रुग्णालये असण्याची गरज नाही. जिल्हा नागरी रुग्णालये, शासकीय रुग्णालये कोरोना बाधितांवर उपचार करतील. आपत्कालीन परिस्थितीत कोविड रुग्णांसाठी बेड उपलब्ध करुन देण्याची जिल्हा अधिकाऱ्यांची योजना असावी. जिल्हा टास्कफोर्सने दररोज परिस्थितीवर लक्ष ठेवले ठेवून भविष्यासाठी योजना तयार केल्या पाहिजेत."
जिल्ह्याच्या पॉझिटिव्हिटी रेटनुसर कोविड रुग्णालयांचे नियोजन व व्यवस्थापन केले पाहिजे, अशा सूचना आरोग्य संचालकांनी केल्या आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 7% पेक्षा कमी असल्यास जिल्ह्यात 5-7 कोविड रुग्णालये असावी. पॉझिटिव्हिटी रेट 7% ते 10% च्या दरम्यान असेल तर एक सरकारी वैद्यकीय रुग्णालय, एक तालुका रुग्णालय कोविडसाठी तयार असेल. पॉझिटिव्हिटी रेट 11% ते 15% दरम्यान असल्यास 20% कोविड रुग्णालये तयार असावीत.
जर पॉझिटिव्हिटी रेट 16% च्या पुढे गेला असेल आणि जर तो 20% पेक्षा कमी असेल तर सर्व मल्टीस्पेशालिटी रुग्णालये सक्रिय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु, पॉझिटिव्हिटी रेटच्या बाबतीत जर पॉझिटिव्हिटी दर 20% च्या पुढे गेला तर अशा परिस्थितीत श्रेणी 1 ते श्रेणी 3 उपाययोजना अंमलात आणण्याचे सूचित करण्यात आले आहे.