देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कोरोना व्हायरस बाधितांची संख्या महाराष्ट्रात सुरुवातीपासूनच अधिक आहे. राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे या शहरांभोवती कोविड-19 चा विळखा अधिक घट्ट आहे. दरम्यान मुंबई, ठाण्यापाठोपाठ आता पुण्यातीलही कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेली बिकट परिस्थिती नियंत्रणात येऊ लागल्याची चिन्हं दिसू लागली आहेत. पुण्यातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.73% इतके असून उपचार सुरु असलेल्यांची टक्केवारी केवळ 20.92% इतकी आहे. तर रुग्ण दुप्पटीचा वेग 38.69 दिवसांवर पोहचला आहे. अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
सुरुवातीच्या काळात पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत होती तर मृत्यूदरही अधिक होता. मात्र त्यानंतर पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार पुण्यात कडक लॉकडाऊन करण्यात आला. तसंच नागरिकांच्या सहकार्याने परिस्थिती सुधारत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Coronavirus in Maharashtra: मुंबई, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरीसह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात किती आहेत कोरोनाचे रुग्ण?)
Murlidhar Mohol Tweet:
#GoodNews : कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.७३ टक्क्यांवर तर उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची टक्केवारी अवघी २०.९२ ! रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३८.६९ दिवसांवर !#PuneFightsCorona pic.twitter.com/UcJkZeH9Kq
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) August 14, 2020
पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या 1,22,020 इतकी असून त्यापैकी 78,838 रुग्ण बरे झाले आहेत. तर 40,225 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. कोरोना संसर्गामुळे 2957 रुग्णांचा बळी गेला आहे. दरम्यान कोरोना व्हायरस संसर्गाच्या परिस्थिती आणि कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 जुलै रोजी पुणे दौरा केला. यावेळी त्यांनी मृत्यूदर रोखण्यासोबत ग्रामीण भागात संसर्ग वाढू नये यासाठी दक्षता घ्या अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.