Coronavirus: अंधेरी परिसरात क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोना व्हायरस संक्रमित महिलेसोबत छेडछाड, एकास अटक
Molestation | Representational Image (Photo Credits: Pixabay)

हॉटेलमध्ये असलेल्या क्वारंटाईन (Quarantine) सेंटरमध्ये एका महिलेसोबत छेडछाड (Covid Positive Woman molested) झाल्याचा प्रकार समोर आले आहे. ही घटना अंधेरी येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी वेळीच दखल घेत आरोपीला अटक केली आहे. आरोपी मेडिकल कोऑर्डिनेटर (Medical Co-ordinator Arrested) असल्याचे समजते. प्राप्त माहितीनुसार पीडित महिलाही पनवेलची निवासी आहे. ती सध्या अंधेरी येथील एका हॉटेलमध्ये तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये होती. दरम्यान, तिच्यासोबत छेडछाड झाली.

पीडितेने तक्रार देताना म्हटले आहे की, आपण एकटे असल्याचे पाहून आरोपीने गैरफायदा घेतला. त्याने आपल्या शरीराला चुकीच्या पद्धतीने स्पर्ष केला आणि आपली छेड काढली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी आरोपी मेडिकल को-ऑर्डिनेटरला अटक केली आहे. सरफराज मोहम्मद खान असे आरोपीचे नाव असल्याचे समजते. (हेही वाचा, Murbad Molestation Case: महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजप नगरसेवक नितीन तेलवाने यांना अटक)

पीडित महिलेची कोरोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटीव्ह आला होता. 7 एप्रिल रोजी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर ही महिला अंधेरी येथील एका हॉटेलमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये निवासाला होती. या वेळी तिच्यासोबत ही घटना घडली.

दरम्यान, राज्यात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे राज्यातील सर्वाधिक कोरोना संक्रमित हे मुंबई शहरात आहेत. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी क्वारंटाईन सेंटर्स उभारण्यात आली आहेत. यात काही शासकीय ठिकाणांचा समावेश आहे. तर काही ठिकाणी हॉटेल्समध्येही क्वारंटाईन सेंटर्स उभारली गेली आहेत. या क्वारंटाईन सेंटर्समध्ये अनेकांना ठेवण्यात येते. अशा वेळी छेडछाडीच्या घटना घडल्या तर एकूण सुरक्षेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण होते. त्यामुळे क्वारंटाईन सेंटर्समध्ये

मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक ठिकाणी क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहेत. यामध्ये अनेक हॉटेल्स, शासनाच्या इमारतींचाही समावेश आहे. अशाच प्रकारे अंधेरीतील या हॉटेलमध्येही क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहे आणि कोरोना बाधित रुग्णांना तेथे ठेवण्यात येते. मात्र, क्वारंटाईन असलेल्या बाधित महिलेसोबत असा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वीही महाराष्ट्रातील विविध भागांत अशा प्रकारे कोरोना बाधित महिलांसोबत छेडछाड झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.