महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर राज्यातील मुंबई, ठाणे, पुण्यात कोरोनाचे दिवसागणिक रुग्णांची वाढ झपाट्याने होत आहे. याच दरम्यान आता आणखी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. त्यानुसार ठाण्यात एकाच दिवसात कोरोना व्हायरसचे शुक्रवारी सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. ठाण्यात एकाच दिवशी 365 कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आकडा आता 7456 वर पोहचला आहे. त्याचसोबत कल्याण-डोंबिवली येथे सुद्धा 358 कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने आकडा 4875 वर पोहचला आहे. तर नवी मुंबई आणि पनवेल शहरात अनुक्रमे 224 आणि 87 नव्या रुग्णांची भर पडली आहे. येथील कोविडच्या रुग्णांचा आकडा अनुक्रमे 5,853 आणि 1699 वर पोहचला आहे.(Lockdown In Navi Mumbai: नवी मुंबई येथील कंटनमेंट झोनसाठी 8 दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर)
मुंबई मेट्रोपोलिटन रिजन (MMR) मध्ये काही कन्टेंटमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. या ठिकाणी सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. केडीएमसी कडून 32 कंन्टेंटमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. म्हणजेच सर्व दुकाने आणि जीवनावश्यक नसलेल्या गोष्टींची दुकाने बंद राहणार आहेत. मात्र अत्यावश्यक सेवासुविधांची दुकाने सुरु राहणार पण त्यांनी सुद्धा होम डिलिव्हरी करावी अशा सुचना त्यांना देण्यात आल्या आहेत. एनएमएमसी यांच्याकडून विविध वॉर्ड्समधील 10 सार्वजनिक परिसर आठवडाभरासाठी कंन्टेंटमेंट झोन घोषित केले आहेत.(Coronavirus Update: तुमच्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण? पहा महाराष्ट्रातील कोरोना बाधितांंची जिल्हानिहाय आकडेवारी)
आजपासून हा लॉकडाऊन सुरु करण्यात आला असून यामध्ये केवळ मेडिकल,हॉस्पिटल,आणि दुध व्यवसायच सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी नागरिकांकडूनच केली जाणार असून स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन करणारे ठाण्यातील हे पहिले परिसर आहेत. #fightagainstcorona
— AIR News Mumbai, घरीच रहा, सुरक्षित रहा (@airnews_mumbai) June 27, 2020
ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, शनिवारी सेंट्रलच्या टीमसोबत एक बैठक पार पडणार आहे. त्यानंतर लॉकडाऊन संबंधित आढावा घेऊन तो उठवण्याबाबत विचार करण्यात येणार आहे. दरम्यान एकूणच महाराष्ट्रातील कोरोनच्या परिस्थिती बाबत बोलायचे झाल्यास आकडा 152765 वर पोहचला असून 7106 जणांचा बळी गेला आहे. राज्यात आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यानुसार नियमात शिथीलता आणत काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.