Ajit Pawar, Deputy Chief Minister of Maharashtra | (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना (Coronavirus) बाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. मुंबईसह पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरातील आकडे चिंताजनक आहे. लॉकडाउनचा तिसरा टप्पा 17 मे रोजी संपणार आहे. याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्‍यमंत्री आणि पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रशासनाला  10 ते 17 मे पर्यंत पुणे (Pune) शहर आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) परिसरातील कन्‍टेन्मेंट झोनमध्‍ये लॉकडाउनची (Lockdown) कठोर अंमलबजावणी करण्‍याच्‍या सूचना दिल्या आहेत. शिवाय, शहरातील ज्‍या भागात करोनाचे अधिक रुग्‍ण आहेत तिथून कोणालाही बाहेर जाऊ देण्‍यात येऊ नये आणि राज्‍य राखीव पोलीस दलाची मदत घ्यायची असेल तर ती मदत उपलब्‍ध करुन दिली जाईल असेही त्‍यांनी सांगितले. पुणे जिल्‍ह्यातील करोना संक्रमितांची वाढती संख्या लक्षात घेत आज उपमुख्‍यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली कौन्सिल हॉल बैठक पार पडली. उपमुख्‍यमंत्री पवार म्‍हणाले की, "मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबई पाठोपाठ पुणे हे महत्वाचे शहर आहे. येथील कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण चिंता वाढविणारे. राज्‍य राखीव पोलीस दलाची मदत घ्‍यावयाची असेल तर तीही उपलब्‍ध करुन दिली जाईल." ('संकट गंभीर असले तरी सरकार खंबीर, मुंबईमध्ये लष्कर येणार नाही'; जाणून घ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संवादातील महत्वाचे मुद्दे)

दुसरीकडे, शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोविड-19 स्थितीसंदर्भात बैठकीत परप्रांतीयांना विशेष गाड्यांद्वारे पाठविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी पवार यांनी अधिकाऱ्यांकडे केली. पवार म्हणाले याचा खर्च राज्य सरकार किंवा सीएसआर निधीतून वहन केले जाईल. शुक्रवारपर्यंत पुणे जिल्ह्यात कोविड-19 संक्रमितांची संख्या 2,572 इतकी आहे. पुणे विभागात 837 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात आज कोरोना व्हायरसचे 1089 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील एकूण बाधितांची संख्या 19063 वर पोहचली आहे.

पवारांसह या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ के व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकरसह अन्य विभागांचे अधिकारीही उपस्थित होते.