Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांची कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणी निगेटीव्ह आली आहे. ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थन सिल्वर ओक येथील दोघे आणि सुरक्षा रक्षकांपैकी तीन जण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत अशी, माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. दरम्यान, यापुढे महाराष्ट्रीत मोठ्या प्रमाणावर फिरु नका अशी विनंती आपण शरद पवार यांना करणार असल्याचेही टोपे यांनी या वेळी सांगितले.

शरद पवार हे पुणे दौऱ्यावर होते. पुणे दौऱ्यावरुन बारामती येथे न जाता पवार हे थेट मुंबईला रवाना झाले. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी उलटसुलट वृत्त दिले. या वृत्तास शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबाबत दिलेली प्रतिक्रिया आणि पवार कुटुंबीयांमध्ये सुरु झालेली चर्चा याची किनार होती. दरम्यान, शरद पवार हे थेट मुंबईला पोहोचले त्यानंतर त्यांनी ब्रिच कँडी रुग्णालयात जाऊन स्वत:ची आरोग्य तपासणी केली.

राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानातील दोन सुरक्षा रक्षक आणि स्वयंपाक करणारी महिला कोरोना व्हायरस संक्रमित असल्याचे आढळून आले आहे. लवकरच हे कर्मचारी कोणाच्या संपर्का आले होते हे शोधले जाईल. तसेच, सिल्वर ओक आणि इतर ठिकाणीचे कोणकोणते लोक या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आले याची माहिती घेतली जाईल. त्या सर्वांना क्वारंटाईन केले जाईल किंवा आवश्यकता भासल्यास त्यांची कोरोना व्हायरस चाचणीही केली जाईल, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Coronavirus: शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओक येथील काही कर्मचारी कोरोना व्हायरस संक्रमित)

शरद पवार हे उन, वारा, पाऊस हे न पाहता लोकांमध्ये मिसळतात. सध्या राज्यावर कोरोना व्हायरस संकटाचे सावट आहे. अशा स्थितीत ही पवर हे राज्यभरात अनेक ठिकाणी दौरे करतात. पवार यांचे वय पाहता ते सध्या ऐंशी पार आहेत. अशा वेळी ज्येष्ठ आणि वृद्ध नागरिकांना कोरोनाचा धोका अधिक असल्याचे जागतिक आरोग्य संघटना सांगते. असे असतानाही निसर्ग चक्रिवादळ असो अथवा अतिवृष्टी. शरद पवार हे राज्यभरात दौरे काढताना दिसत आहेत. नुकताच त्यांनी औरंगाबाद, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याचाही दौरा केला होता.