Coronavirus: शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओक येथील काही कर्मचारी कोरोना व्हायरस संक्रमित
Sharad Pawar | (Photo Credits-Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवसस्थानी कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग झाल्याचे वृत्त आहे. संक्रमित झालेले सर्व कर्मचारी हे पवार यांच्या मुंबई (Mumbai) येथील सिल्वर ओक (Silver Oak) निवासस्थानी कार्यरत असतात. या कर्मचाऱ्यांची निश्चित संख्या अद्याप समजू शकल नाही. सूत्रांच्या माहितीनुसार ही संख्या दोन ते सहा इतकी आहे.

प्राप्त माहितीनुसार, सिल्वर ओक येथील सर्व कर्मचाऱ्यांची एक रॅपीड टेस्ट नुकतीच करण्यात आली. या टेस्टमध्ये काही जवाणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. या कर्मचाऱ्यांची संख्या सहा इतकी असल्याचे समजते. हे सर्व कर्मचारी पवार यांच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षक असल्याचे समजते. मात्र, या कर्मचाऱ्यांचा शरद पवार यांच्याशी कोणताही संपर्क आला नसल्याचेही सांगितले जात आहे.

दरम्यान, सिल्वर ओकवरील ज्या कर्मचाऱ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्या सर्व कर्मचाऱ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर पॉझिटीव्ह कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरस संक्रमन आढळल्याने सिल्वर ओकवर एकच खळबळ उडाली आहे. सर्व उपाययोजना अधिक कडकपणे राबवण्यात येत आहेत. (हेही वाचा, भाजप नेते निलेश राणे यांना कोरोना विषाणूची लागण; तब्येत व्यवस्थित असून, क्वारंटाईन मध्ये असल्याची दिली माहिती)

पार्थ पवार यांच्यावरील प्रतिक्रियेनंतर पवार कुटुंबीयांतील सदस्यांच्या गाठीभेटीचे प्रमाण वाढले आहे. शरद पवार हे कालच पुणे दौऱ्यावर होते. मात्र, पुणे दौऱ्यावरुन बारामतीला न जाता पवार हे थेट मुंबईला आले आहेत. त्यामुळे अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. मात्र, शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, सिल्वर ओकवरील काही कर्मचारी कोरोना पॉझिटव्ह साबडल्यानंतर शरद पवार कोणालाही न भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.