Maharashtra Monsoon Session 2020: पावसाळी अधिवेशनावर कोरोना विषाणूचे सावट; कामकाज सल्लागार समितीची सोमवारी बैठक

कोरोना विषाणूने (Coronavirus) महाराष्ट्राला हादरून सोडले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात कायम आहे. कोरोनामुळे राज्यातील अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. आता कोरोना विषाणूचा फटका राज्य विधिमंडाळाच्या पावसाळी अधिवेशनला (Maharashtra Monsoon Session 2020) बसण्याची शक्यात आहे. कोरोना विषाणूची साथ सुरू झाल्याने आठवडाभर आधीच राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळल्यानंतर आता कोरोनाबाधीत रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे 22 जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट आहे. हे अधिवेशन ठरल्याप्रमाणे घ्यायचे आहे की, पुढे ढकलायचे? यावर विचार सुरू असून सोमवारी (18 मे रोजी) विधिमंडळ कामकाज सल्लागार समिती बैठकीत त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

महाराष्ट्र विकास आघाडीचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 फेब्रुवारी रोजी सुरू झाले होते. तसेच 20 मार्चपर्यंत ते चालणार होते. मात्र, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आपापल्या मतदारसंघात असावेत आणि प्रशासनावर अतिरिक्त ताण नको म्हणून अंतरिम अर्थसंकल्प मांडल्यानंतर लगेच 14 एप्रिल रोजी म्हणजेच एक आठवड्यापूर्वीच अधिवेशन गुंडाळण्यात आले होते. मुंबईत 22 जूनपासून पावसाळी अधिवेशन आयोजित केले जाणार होते. महत्वाचे म्हणजे, पावसाळी अधिवेशन 3 आठवड्यांचे होणार आहे, अशीही माहिती समोर आली आहे. मात्र, राज्यात आता कोरोनाची साथ वाढली आहे. सर्व यंत्रणा करोनानियंत्रण व इतर अनुषंगिक गोष्टींमध्ये गुंतल्या आहेत. पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून घ्यायचे झाल्यास तारांकित प्रश्न व त्यावरील उत्तरांच्या कामकाजात सर्व जिल्ह्यातील प्रशासनाला काम करावे लागेल. हे देखील वाचा- ठाणे: कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता माजिवाडा मानपाडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रामध्ये 'या' भागात 18 मेपर्यंत लॉकडाऊनचे नियम कडक!

महत्वाचे म्हणजे, 30 जूनपर्यंत देशात श्रमिक व विशेष रेल्वे खेरीज कोणत्याही रेल्वे गाड्या चालवल्या जाणार नाहीत. त्यामुळे विधिमंडळाचे सदस्य अधिवेशनाला उपस्थित राहू शकणार नाहीत. त्या पार्श्वभूमीवर सोमवारच्या बैठकीत अधिवेशनासंदर्भात चर्चा होईल. कोरोनोला अटकाव करण्यासाठी सरकारने मोठा खर्च केला. यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.