फोटो सौजन्य - फाइल फोटो

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याने ही एक गंभीर बाब आहे. त्यासाठीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाउन येत्या 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आल्याचा निर्णय शनिवारी घोषित केला आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आढळून आले आहेत. मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजाराच्या पुढे गेला आहे. तरीही काही नागरिक लॉकडाउनच्या आदेशाचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत.त्यामुळे अशा नागरिकांच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. याच पार्श्वभुमीवर आता मुंबईत काही व्यक्तींकडून मैदानावर क्रिकेट खेळण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

वाडाळा पोलिसांनी याबाबत अधिक माहिती दिली असून त्यांनी असे सांगितले आहे की, अजून तीन जण सुद्धा मीठानगर येथे खेळत होते. मात्र पोलिसांनी घटनास्थळी पोहचताच त्यांनी तेथून पळ काढल्याचे ही सांगण्यात आले आहे. त्याचसोबत मैदानात खेळणाऱ्यांची सुद्धा ओखळ पोलिसांनी पटवली आहे. पोलीस उपायुक्त रश्मी करंदीर यांनी असे म्हटले आहे की, पोलिसांनी मुकेश जैयस्वाल, हरिश सरोज आणि अमन खान यांना अटक केली आहे. यांच्या विरोधात कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचसोबत अन्य जणांना सुद्धा अटक होण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आहे.(Coronavirus: कोपरीमध्ये एकही कोरोना बाधित रूग्ण न आढळल्याने ग्रीन झोन म्हणून घोषित) 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्चला देशभरात लॉकडाउनचे आदेश जाहीर केले. त्यानंतर पोलिसांकडून कलम 144 सुद्धा विविध राज्यासह मुंबईत लागू करण्यात आला होता. तर आज मुंबईत नवे 217 कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने आकडा 1399 वर पोहचल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्याचसोबत 97 जणांचा मृत्यू झाला आहे.