महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबई आणि पुण्यात आढळून आहे. सध्या मुंबईतील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली आहे. तसेच पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होणाच्या प्रमाणातही वाढ होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकतीच कोरोनावरील उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली आहे. दरम्यान, पुण्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करण्यात यावे, अशाही सूचना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. ही एक समाधानाची बाब आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासोबतच्या उपाययोजनाबरोबरच कोरोनाबाधित रुग्णाला वेळेवर उपचार मिळतील याबाबत दक्षता घेण्यात यावी, असे अजित पवार म्हणाले आहेत. तसेच, कोरोना विषाणूची भिती घालविण्यासाठी तसेच याविषयी जनसामान्यांमध्ये सतर्कता आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती होण्यासाठी छोट्या-छोट्या व्हिडीओच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हे देखील वाचा- Coronavirus Updates in Pune: पुण्याचा रिकव्हरी रेट 76.73 टक्के तर रुग्ण दुप्पटीचा वेग 38 दिवसांवर- महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती
पुणे शहरात गुरुवारी संध्याकाळी नव्याने 1 हजार 91 रुग्ण आढळून आले. तर, 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या 70 हजार 326 एवढी झाली आहे. गुरुवारी अखेर 1 हजार 656 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर उपचार घेणार्या 1 हजार 156 रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे काल अखेर 53 हजार 958 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली होती.