Ajit Pawar, Raj Thackeray (Photo Credit: PTI, Twitter)

महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा (Coronavirus) विळखा वाढू लागला आहे. राज्यातील विविध शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात मुंबईसह पुण्यात (Pune) मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. याचपार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज जनतेशी संवाद साधला. दरम्यान, कोरोना नियमाचे पालन करणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचे आवाहन अजित पवार यांनी नागरिकांना केले आहे. अजित पवार यांच्या आवाहनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीदेखील पदाधिकाऱ्यांसोबतची बैठक रद्द केली आहे. यासंदर्भात मनसे नेते बाबू वागस्कर यांनी माहिती दिली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्याने नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटीचे आयोजन केले होते. नियोजित दौऱ्यानुसार राज ठाकरे सकाळी मुंबईहून निघाले आणि ते पुण्यात पोहचले. मात्र, पुण्यात कोरोनाचे जाळे पसरत असल्याने राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसोबतची बैठक रद्द केली आहे. एका पदाधिकाऱ्यांसोबत केवळ एक व्यक्ती जरी आला तर, बैठकीला येणाऱ्यांची संख्या शंभरी ओलाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या गाठीभेटी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वागस्कर यांनी दिली आहे. तसेच एप्रिल महिन्यात मोजक्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला जाईल, असेही वागस्कर म्हणाले आहेत. हे देखील वाचा- केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि पत्नी सीमा आठवले यांनी J. J. Hospital मध्ये घेतला Covid-19 Vaccine चा पहिला डोस

पुण्यात वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या चिंताजनक आहे. पुण्यात गुरुवारी (11 मार्च) तब्बल 2 हजार 841 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाचा वाढता धोका पाहता महापालिकेने कठोर कारवाई करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. पुण्यात लग्न समारंभ, धार्मिक विधी, सार्वजनिक कार्यक्रम, अंत्यविधीप्रसंगी आणि दशक्रियाविधीसाठी फक्त 50 लोकांना परवानगी असणार आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.

राज्यात काल 14317 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 7193 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2106400 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 106070 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.94% झाले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.