Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अखेर सामान्य मुंबईकरांना मुंबई लोकलमधील प्रवेश रोखण्यात आला आहे. शनिवार 21 मार्चच्या रात्री उशिरा अखेर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार आज (22 मार्च) पासून केवळ अत्यावश्यक सेवा देणार्‍या लोकांनाच मुंबई लोकलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. मुंबई लोकलच्या एंट्री आणि एक्झिट पॉंईटवर काही विशेष अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यांच्याद्वारा प्रवाशांचं ओळखपत्र तपासून केवळ अत्यावश्यक सेवांमध्ये असलेल्या कर्मचार्‍यांना आता ट्रेनमध्ये प्रवेश दिला जाईल. दरम्यान सामान्यांसाठी मुंबई लोकलचा प्रवास अनिश्चितकाळासाठी थांबवण्यात आला आहे. सध्या देशात कोरोनाबाधितांचा आकडा 300 च्या वर गेला आहे तर देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र राज्यात असल्याने आता प्रशासनाला कडक पाऊलं उचलणं हे भाग ठरलं आहे. कोरोना व्हायरस हा संसर्गातून पसरत असल्याने तो झपाट्याने नागरिकांमध्ये पसरू नये म्हणून हा खबरदारीचा उपाय म्हणून निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच मुंबईकरांना विनाकरण गर्दी न करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार आता अत्यावश्यक सेवा वगळता सार्‍या इतर सेवा , ऑफिस बंद करण्यात आले आहेत. Coronavirus चा प्रसार रोखण्यासाठी सरकारी ऑफिसेसमध्ये AC चा कमीत कमी वापर करण्याचे राज्य सरकारचे आदेश.  

ट्वीट

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि मेडिकल इमर्जन्सी असल्या शिवाय नागरिकांना लोकल प्रवास करु दिला जाणार नाही. मुंबई मध्ये प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम मुख्य प्रवेशद्वारांवर खास पथकं नेमली जाणार आहेत. यामध्ये 1 GRP, 1 राज्य पोलीस, महसूल विभागाचा एक प्रतिनिधी आणि एक वैद्यकीय प्रतिनिधी यांचा यांचा समावेश असेल.