Coronavirus: 'जनता कर्फ्यू' लागू होताच गुन्हेगार लपले घरात, एकही गुन्हा घडला नाही पिंपरी चिंचवड शहरात
Pimpri Chinchwad Police Commissioner Office | (File Image)

'जनता कर्फ्यू' (Janata Curfew) हा कोरोना व्हायरस नियंत्रणात आणण्याची उपाययोजना म्हणून पाळण्यात आला. त्याचा फायदा कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी किती झाला हे अद्याप पुढे आले नाही. कारण, सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान काही अतिउत्साही लोकांनी गर्दी करुन 'जनता कर्फ्यू'च्या मूळ उद्देशालाच हादरा दिला. असे असले तरी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय (Pimpri Chinchwad Police Commissioner Office) दप्तरी एका मोठ्या घटनेची नोंद झाली. काल म्हणजेच रविवार, 22 मार्च 2020 या दिवशी पिंपरीच चिंचवड पोलीस आयुक्तालयात एकाही गुन्ह्याची नोंद झाली नाही. विशेष असे की, पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) पोलीस आयुक्तालयाच्या आजवरच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय स्थापन होऊन आता जवळपास दोन वर्षे होत आली. 15 ऑगस्ट 2018 या दिवशी पिंपरी चिंचवड आयुक्तालय स्थापन झाले. तेव्हापासून पिंपरी चिंचवड शहरात विविध गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यात हुंडाबळी, चोरी, बलात्कार, दरोडा, हत्या, खंडणी, हाफ मर्डर, सायबर क्राईम यांसह एक ना अनेक गुन्ह्यांचा समावश आहे. 15 ऑगस्ट 2018 पासून 21 मार्च 2020 पर्यंत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात असा एकही दिवस घडला नाही. ज्या दिवशी गुन्हाच नोंद झाला नाही. अपवाद घडला फक्त 22 मार्च 2020 या दिवसाचा.

कोरोना व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी सरकार अनेक प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून 'जनता कर्फ्यू'चे आयोजन करण्यात आले. याचा परिणाम असा झाला की, लोक घरीच थांबले. परिणामी शहरातील गुन्हेगार आणि भुरट्या चोरांनाही एकाच ठिकाणी स्थानबद्ध रहावे लागले. त्यामुळे पोलीस आयुक्तालयात एकही गुन्हा नोंद झाला नाही. अर्थात काही उपद्वापी मंडळी रस्त्यांवर आल्यामुळे पोलिसांना कारवाई करावी लागली. नियमभंग झाला म्हणून 6 जणांवर केलेली कारवाई वगळता एकही गुन्हा नोंद झाला नाही. (Coronavirus: टाळ्या, थाळ्ंयांच्या गजरात महाराष्ट्राचा 'इटली' होऊ नये, म्हणून घरातच बसा- सामना)

दरम्यान, देशातील कोरोना संक्रमीत असलेल्या रुग्णांचा आकडा आता 390 पेक्षाही अधिक झाला आहे. एकट्या महाराष्ट्रातच कोरोना बाधित रुग्णांची संख्या 89 वर पोहोचली आहे. कोरोना संक्रमीत संशयितांचा आकडाही मोठा आहे. त्यात वाढही होत आहे. त्यामुळे राज्य सरकार दक्ष झाले आहे. म्हणूनच लॉकडाऊन करण्याचा आणि जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.