कोरोना व्हायरस (Coronavirus) महाराष्ट्रात दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मंत्रीमंडळाची बैठक (Cabinet Meeting) बुधवारी (11 मार्च 2020) बोलावली आहे. या बैठकीत कोरोना व्हायरस विरोधात उपाययोजना आणि त्याचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक ते निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरस (COVID-19) जगभरात थैमान घालत असताना भारत मात्र अद्याप निर्धोक होता. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये भारतातही कोरोना व्हायरसची लागण झालेले काही रुग्ण आढळले. महाराष्ट्रातही पुणे (Pune) येथे 5 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे पुढे आले आहे. या पाचही जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस बाधित रुग्ण असल्याचे निदान पहिल्यांदा पुण्यात झाले. पुणे येथे सुरुवातीला दोन रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती पुढे आली. यो दोन्ही रुग्णांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटिव्ह आली. हे दोन्ही रुग्ण पती-पत्नी आहेत. दोघेही दुबईहून भारतात आले होते. दरम्यान, या दाम्पत्याच्या मुलीलाही कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. या मुलीचीही चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे राज्य सरकार आणि आरोग्य विभाग सतर्क झाले असून हे दाम्पत्य कोणकोणत्या नागरिकांच्या संपर्कात आले होते यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, धक्कादायक असे की, पुण्यात ज्या दाम्पत्याला कोरोना व्हायरस झाला आहे. त्या दाम्पत्याला सेवा पुरवणाऱ्या टॅक्सी चालकालाही कोरोना व्हायरची लागण झाला आहे. तसेच, या दाम्पत्याने ज्या विमानाने प्रवास केला त्या वमानातील सहप्रवाशांनाही कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे पुढे आले आहे. (हेही वाचा, पुण्यात कोरोना व्हायरसचे आणखी 3 रुग्ण; शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाचवर पोहचली)
पुण्यातील कोरोना व्हायरस बाधीत रुग्णांची संख्या आता पाचवर पोहोचली आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर येत्या काळात कोरोना व्हायरसचे संकट कोसळण्याची शक्यता आहे. भविष्यात उद्भवणारा धोका वेळीच ओळखून राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर सतर्क झाले आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या (बुधवार, 11 मार्च 2020) राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.