COVID-19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

मुंबई (Mumbai) शहरातील एका विद्यार्थ्याला कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधा झाल्याचे वृत्त आहे. हा विद्यार्थी इयत्ता दहावीत शिकत (Class X Student) असून, त्याची बोर्डाची परीक्षा सुरु होती. दक्षिण मुंबई येथील एका परिक्षा केंद्रावर या विद्यार्थ्याने परीक्षा दिली. दरम्यान, त्याला कोरोना व्हायरस बाधा (COVID-19) झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्याच्या संपर्कात आलेले शिक्षक, शालेय कर्मचारी आणि विद्यार्थी यांचा शोध मुंबई महापालिका आणि राज्याचा आरोग्य विभाग घेत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

कोरोना व्हायरस संकट निवारणासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले. यात शाळा, महाविद्यालयं, अंगणवाड्या, मॉल, दुकाने बंद ठेवली. सुरुवातीला जमावबंदी आणि त्यानंतर संचारबंदीही जाहीर केली. दरम्यान, दहावीची परीक्षा मात्र राज्य सरकारने सुरुच ठेवली. मात्र, विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या प्रमाणावर मागणी केल्यानंतर अखेर एका विषयाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. याच काळात दक्षिण मुंबई येथील एका परिक्षा केंद्रावर या विद्यार्थ्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (हेही वाचा, Coronavrius: कोरोना व्हायरस संदर्भातील शंका दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्रात 'हेल्पलाईन नंबर' ची घोषणा)

शक्यता व्यक्त केली जात आहे की, कोरोना व्हायरस बाधित हा विद्यार्थी सुमारे 35 ते 40 विद्यार्थ्यांच्या संपर्कात आला असावा. तसेच, तो काही शिक्षक आणि शालेय कर्मचारी आदींच्याही संपर्कात आला असावा. आरोग्य विभागाकडून सर्व संशयितांचा शोध सुरु आहे. दरम्यान, या विद्यार्थ्याने ज्या परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली. त्या परीक्षा केंद्रावर सुमारे 353 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. हा वद्यार्थी ज्या परीक्षागृहात होता त्यात जवळपास 25 ते 30 विद्यार्थी होते. शिक्षण विभागाने या विद्यार्थ्याची माहिती आरोग्य विभागाला दिल्याचे समजते.