Coronavirus 3rd Wave: कोरोना विषाणूची संभाव्य तिसरी लाट गृहित धरून काटेकोर नियोजन करण्याचे उप मुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश
Ajit Pawar (Photo Credit: Twitter)

पुण्यातील विधान भवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणू (Coronavirus) परिस्थिती आणि उपाययोजनाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीवर भर द्यावा असे सांगितले. त्याचबरोबर आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा, बेड उपलब्धता व रेमिडिसिवीर इंजेक्शन उपलब्धता यासोबतच कोरोनाबाधित रूग्णांना उपचार सुविधांमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही, यासाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न सुरु आहेत, असेही ते म्हणाले.

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट गृहित धरून काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. लसीकरणाला गती देण्यावर राज्य शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन पुरवठ्यामध्ये कमतरता भासणार नाही, यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णांला आवश्यक  वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या सुविधांमध्ये तातडीने वाढ करा, ग्रामीण भागात रूग्णसंख्या वाढू नये म्हणून सजग राहून नियोजन करणे आवश्यक आहे. (हेही वाचा: कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्व काही केंद्र सरकारनेच करायचे असेल, तर राज्य सरकार स्वतःहून काय करणार?, चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल)

राज्यशासनाने 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने आवश्यक निधीची तरतुद केलेली आहे. परंतू लसीची उपलब्धता ही मर्यादित असल्याने नागरिकांनी लगेच लस केंद्रांवर गर्दी करू नये, कोविन ॲपवर नोंदणी केल्यानंतर जी तारीख आणि वेळ मिळेल त्या दिवशी जाऊन लस घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. कोरोना महामारीच्या संकटकाळात गरजूंना अन्नधान्य उपलब्ध व्हावे, यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना एक महिन्याचे मोफत अन्नधान्य वितरीत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील हजारो गरजू कुटुंबांना त्याचा लाभ होईल, अशा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.