Dharavi & Coronavirus | (Photo credit: archived, edited, symbolic images)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. तसेच नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. मुंबईतील ज्या परिसरात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत त्या ठिकाणी सील करण्यात आले आहेत. याच पार्श्वभुमीवर धारावी येथे सुद्धा कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आल्यानंतर परिसर सील करण्यात आला आहे. याच दरम्यान धारावीत (Dharavi) आणखी 3 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने आकडा 17 वर पोहचल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.

गुरुवारी धारावी येथे 70 वर्षीय महिलेचा कोरोना व्हायरसने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धारावी येथे झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात असल्याने कोरोनाच प्रादुर्भाव अधिक पसरण्याची शक्यता आहे. मात्र तरीही महापालिकेकडून या परिसरात खबरदारी घेतली जात आहे. स्थानिक नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी असून त्यांना अत्यावश्यक सेवासुविधा काही वेळेस घरीच नेऊन दिल्या जातात. तर आता कोरोनाचे धारावी येथील एकूण रुग्ण 17 वर पोहचले असून त्यात 3 जणांनी आपला जीव सुद्धा गमावला आहे.(मुंबई: धारावीतील कंटेनमेंट, बफर झोन मध्ये भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फेरीवाल्यांना बंदी; कोरोना व्हायरसचा धोका आटोक्यात ठेवण्यासाठी BMC चे आदेश)

दरम्यान, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण धारावीत आढळून आला होता. यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने धारावीतील काही भाग सील करण्यात आला. मात्र त्यावेळी काही लोकांनी बीएमसी कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचा प्रकार घडल्याचे दिसून आले. या प्रकरणी आरोपींच्या विरोधात विविधा कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.