Rajesh Tope (Photo Credits: Twitter)

आज अमरावतीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अमरावतीमधील (Amravati) आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या पत्रकार परिषदेत एका कोरोनाग्रस्त रुग्णांनी शिरकाव केला. या घटनेची माहिती मिळताचं संपूर्ण पत्रकार परिषदेत एकच खळबळ उडाली. या रुग्णाने आपल्याला बेड मिळत नसल्याची तक्रार करत राजेश टोपे यांना भेटण्याची मागणी केली. आज राजेश टोपे यांनी अमरावतीतील कोविड रुग्णांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला.

या प्रकारामुळे पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या सर्वांचीचं ताराबंळ उडाली. यावेळी या रुग्णाने आपण कोरोना पॉझिटिव्ह असून आपल्याला कोविड रुग्णालयामध्ये बेड मिळत नसल्याचा आरोप केला आहे. आरोग्य मंत्र्यांना भेटून तक्रार करणार असल्याचंही या रुग्णाने म्हटलं. (हेही वाचा -Coronavirus Plasma Therapy: कोरोना व्हायरस उपचारांसाठी किफायतशीर दरात प्लाझ्मा उपलब्ध; जाणून घ्या राज्य सरकारने निश्चित केलेली प्रति बॅग किंमत)

दरम्यान, या सर्व प्रकाराची माहिती मिळताचं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संबंधित कोरोना रुग्णाला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, हा रुग्ण जिल्हाधिकारी कार्यालयात न जाण्याच्या निर्णयावर ठाम राहिला. त्यानंतर कोविड रुग्णालयातील कर्मचारी पीपीइ किट घालून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. परंतु, राजेश टोपे यांना भेटण्यासाठी कोरोना रुग्ण संपूर्ण पत्रकार परिषद होईपर्यंत बाहेर बसून होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याची समजूत काढून त्याला कोविड रुग्णालयात दाखल केलं.

दरम्यान, सध्या अमरावती जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या 12 हजाराहून अधिक आहे. आतापर्यंत यातील 8 हजारांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच सध्या 3 हजार रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याशिवाय आतापर्यंत जिल्ह्यातील 240 जणांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना संक्रमण अधिक प्रमाणात वाढताना दिसून येत आहे.