Shirdi Sai Baba Mandir(Photo Credit: Wikimedia Commons )

साई (Sai Baba) जन्मभूमीचा वाद आता शिगेला पोहचला आहे. पाथरी गावाला साईंचे जन्मस्थान म्हणून संबोधण्याच्या निषेधार्थ, शिर्डीकरांनी (Shirdi) रविवारी 19 जानेवारीपासून शहर अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारीपासून अनिश्चितकालीन बंद सुरू होण्यापूर्वी शनिवारी सायंकाळी ग्रामसभा घेण्यात येणार आहे.

शुक्रवारी पंचक्रोशीचे अधिकारी व ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर शिर्डीवासीयांनी बंदमध्ये भाग घेण्याचा निर्णय घेतला. सीएम उद्धव ठाकरे यांच्या वक्त्यव्यानंतर शिर्डी गावातील लोकांमधील संतापामध्ये अजूनच भर पडली. आता ग्रामस्थांनी बंद पुकारल्याने साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला येणाऱ्या भाविकांना बाबांचे दर्शन मिळेल, मात्र  शहरात राहण्याची व खाण्याची पिण्याची सुविधा मिळणार नाही.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, औरंगाबादमध्ये झालेल्या आपल्या सभेत पाथरी गावाचा उल्लेख केला होता. लोकांना संबोधताना त्यांनी, पारथी गावात ज्या ठिकाणी साईबाबांचा जन्म झाला, तिथे 100 कोटींची विकासकामे केली जातील आणि पाथरी गावात अनेक प्रकल्प राबविले जातील असे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर साईबाबांचे जन्मस्थळ पाथरी गावात जणूकाही आनंदाची लाटच पसरली.

मात्र ‘साईसतचरित्र’मध्ये कुठेही साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख नाही किंवा त्यांच्या जातीचाही उल्लेख नाही. मात्र पाथरी गावातील काही लोक साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत कोणताही अधिकृत पुरावा नसतानाही, याबद्दल चुकीची महित्ती पसरवत आहे असे शिर्डीकरांचे म्हणणे आहे. याच गोष्टीचा निषेध करण्यासाठी शिर्डीबंदचे आवाहन केले गेले आहे. शिर्डी साई नगर गावातील लोकांचे म्हणणे आहे की, मुख्यमंत्र्यांनी पाथरी गावात 100 कोटी नव्हे, तर 200 कोटीची विकास कामे करावीत, त्याला आक्षेप नाही पण पाथरीला साईबाबांचे जन्मस्थळ संबोधणे योग्य ठरणार नाही.

(हेही वाचा: 24 जानेवारीला महाराष्ट्र बंद! नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीची घोषणा)

दरम्यान, रविवारपासून शिर्डी अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यावेळी केवळ साईबाबांचे मंदिर खुले राहील, परंतु शहरात कोणतीही दुकाने, हॉटेल आणि कोणतेही आश्रम उघडले जाणार नाही. शिर्डी शहरात वाहनेही चालविली जाणार नाहीत. शिर्डी येथे येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण होऊ नाहे म्हणून, ही 2 दिवसांपूर्वीच शिर्डी बंदचा संदेश देशभरात दिला जात आहे.