Shiv Sena Vs Congress: भिवंडी येथे शिवसैनिक आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; 5 जण जखमी
Shiv Sena Vs Congress (Photo Credit: Twitter)

कोरोनाच्या काळात एप्रिल ते डिसेंबरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर अखेर आज (15 जानेवारी) राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडले आहे. येत्या 18 जानेवारीला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी मतदान, अडीच लाखांहून अधिक उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद आहे. मात्र, याचपार्श्वभूमीवर भिवंडीत आज सकाळी सोनाळे गावात शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला आहे. या धुमश्चक्रीत दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी फोडल्याची माहिती समोर आली आहे.

विजय पाटील असे काँग्रेसच्या उमेदवारांचे नाव आहे. तर, सुनील हरड आणि कैलास पाटील असे शिवसैनिकांचे नाव आहे. आज सकाळी या दोन गटात किरकोळ कारणांवरून बाचाबाची झाली होती. त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला. या धुमश्चक्रीत दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी फोडली आहेत. या घटनेत 5 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर त्यांना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते, अशी माहिती न्युज 18 लोकमतने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- Maharashtra Gram Panchayat Elections 2021: ग्रामपंचात निवडणुकीसाठी 14 हजार 234 गावांमध्ये मतदानन संपन्न; सर्वांना 18 जानेवारीच्या मतमोजणीची उत्सुकता

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन राज्यात महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली होती. मात्र, औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक चकमक सुरु आहे. महाराष्ट्रात भिन्न विचाराचे तिन्ही पक्ष एकत्र आले असून यांचे सरकार जास्त काळ टिकणार नाही, अशी टीका वारंवार विरोधी पक्षांकडून केली जात आहे. यातच औरंगाबाद नामंतराचा मुद्दा आणि आज भिवंडी येथे घडलेला हा प्रकार पाहून विरोधकांचे भाकीत खरे ठरते की काय? हे येत्या काही काळातच स्पष्ट होईल.