भाजपच्या संपर्कात येऊन एकही आमदार फुटणार नाही असे भाजपेत्तर राजकीय पक्षाच्या नेतृत्वाला विश्वास असला तरी खात्री नाही. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस पक्ष (Congress) नेतृत्वाने आपापली तटबंदी मजबूत करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी शिवसेनेपाठोपाठ आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांनाही मुंबईत बोलावले आहे. शिवसेना (Shiv Sena) नेतृत्वाने आपले आमदार आगोदरच मुंबईत एका हॉटेलवर स्थानबद्ध केले आहेत. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वही सतर्क झाल्यचे पाहायला मिळत आहे.
भाजप-शिवसेना सत्तासंघर्षातील तिडा सुटत नाही. त्यामुळे राज्यात सत्तास्थापनेस विलंब होत आहे. दरम्यान, शिवसेनेसोबत सत्तास्थापन होत नाही. तसेच, सरकारस्थापनेसाठी आवश्यक संख्याबळही जुळत नाही. त्यामुळे भाजपने आता इतर पक्षांच्या आमदारांकडे लक्ष वळवले आहे. म्हणूनच भाजप नेते आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांना फोन करत असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या आधीच केला आहे.
जयंत पाटील यांच्याप्रमाणे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही भाजपवर असाच आरोप करत, भाजप नेत्यांकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांना विविध प्रलोभनं दाखवली जात आहेत, असा आरोप केला आहे. दरम्यान, संभाव्य धोका टाळण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वानेही शिवसेनेप्रमाणेच सावध भूमिका घेत आपल्या आमदारांना बोलावणं धाडलं आहे. काँग्रेसच्या सर्व आमदारांना मुंबईत दाखल होण्याचे आदेश दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. (हेही वाचा, घोडेबाजार रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा सावध पवित्रा, शिवसेना आमदार रंगशारदा येथे दाखल)
दुसऱ्या बाजूला आपले आमदार फुटू नये यासाठी काँग्रेस नेतृत्वाने ही खबरदारी घेतली आहे की, राज्यात काही नव्या राजकीय समिकरणांची जुळवाजुळव केली जात आहे याबाबत उत्सुकता आहे. काँग्रेसमधील तरुण आमदारांचा एक गट शिवसेनेसोबत जावे या विचाराचा आहे. काही झाले तरी भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असा या आमदारांचा विचार आहे. यावर काँग्रेस नेतृत्वाने अद्याप तरी काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.