शिवसेना-भाजप यांच्याती सत्तासंघर्षाने अत्त्युच्च टोक गाठले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. परिणामी राज्यात सत्तास्थापनेसाठी घोडेबाजार रंगण्याची चिन्हे आहेत. संभाव्य घोडेबाजार रोखण्यासाठी तसेच आपले आमदार फुटू नये यासाठी शिवसेना (Shiv Sena) नेतृत्वाने सावध पवित्रा घेतला आहे. त्यासाठी शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांची निवासव्यवस्था हॉटेल रंगशारदा (Rangsharda Hotel) येथे केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक 'मातोश्री' निवासस्थानी पार पडली. या बैठकीत सरकार स्थापनेसंबंधीचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांना देण्याचा ठराव मंजूर झाला. त्यानंतर शिवसेनेने आपले आमदार रंगशारदा येथे ठेवले आहेत. महत्तवाचे म्हणजे रंगशारदा हे ठिकाण ठाकरे यांचे निवास्थान 'मातोश्री' नजीक आहे.
दरम्यान, भाजपकडून होणारा संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी शिवसेना आमदारांना रंगशारदा येथे ठेवण्यात येणार असल्याची चर्चा सकाळपासूनच होती. या शक्यतेबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारले असता राऊत यांनी ती शक्यता फेटळून लावली. तसेच, शिवसेना आमदार फोडण्याची कोणात हिंमत नसल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, सत्तास्थापनेसाठी भाजप नेत्यांकडून फोडाफोडीचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांना भाजप नेते फोन करत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. मात्र हा आरोप करतानाच भाजपने कितीही प्रयत्न केले तरी आमचे आमदार फुटणार नाहीत, असा विश्वासही या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला आहे. (हेही वाचा, खळबळजनक! 'भाजप नेत्यांचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांना फोन'; महाराष्ट्रात सत्तासंघर्ष शिगेला)
शिवसेना-भाजप यांच्यात सत्तासंघर्ष निर्माण झाल्याने महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. या पेचामुळे राज्यावर राष्ट्रपती राजवटीची टांगती तलवार टकत असल्याची भावना राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.