कसबा विधानसभा पोटनिवडणूक (Kasba Assembly by-election) अत्यंत घासून झाली. ज्यात भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख मोडीत निघाली. पाठिमागील अनेक वर्षे भाजपच्या ताब्यात असलेला मतदारसंघ महाविकासआघाडीने खेचून घेतला आणि या मतदारसंघावर आता काँग्रेसचा (Congres) झेंडा फडकला. काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला. या विजयाचा गुलाल उधळून झाल्यावर रविंद्र धंगेकर यांनी खिलाडूपणा दाखवला. कसब्यातून खासदार असलेले भाजप नेते गिरीश बापट यांची धंगेरकर यांनी भेट घेतली. गिरीश बापट हे आजारी आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. असे असले तरी पोटनिवडणूक प्रचारासाठी ते मैदानात उतरले होते. त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि मतदानासाठी मतदान केंद्रावर हजेरीही लावली.
रविंद्र धंगेकर यांनी गिरीश बापट यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या वेळी गिरीश बापट यांनी धंगेकरांचे दिलखुलास स्वागत केले. त्यांना आशीर्वाद दिले आणि त्यासोबत मोलाचा सल्लाही दिला. जनतेची कामे कर. त्यासाठी योग्य व्यवस्थापन आणि वेळेचे नियोजन कर. लोक तुला आणखी समर्थन देतील. काही अडचण आली. गरज वाटली तर मला भेट, मी तुला मार्गदर्शन करेन, असेही बापट या वेळी म्हणाले. राजकारणातील हेवेदावे बाजूला ठेऊन झालेली ही भेट पुण्याच्या राजकारणाला साजेशी होती. प्रसारमाध्यमांनीही या भेटीकडे सकारात्मक पाहिले. (हेही वाचा, Reasons for BJP's defeat in Kasba: बालेकिल्ला कसबा येथील भाजप पराभवाची प्रमुख कारणे; देवेंद्र फडणवीस सुद्धा जबाबदार)
दरम्यान, रविंद्र धंगेरकर हे खरे जायंट किलट ठरले आहेत. कसबा हा आजवर भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. या ठिकाणाहून गिरीश बापट पाठिमागील अनेक वर्षे निवडून आले. दरम्यान, पक्षाने त्यांना खासदारकीसाठी संधी दिली. त्यामुळे या ठिकाणाहून मुक्ता टिळक यांनी आमदारकी लढवली आणि ती जिंकलीही. दरम्यान, मुक्ता टीळक यांच्या अकाली निधामुळे रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत भाजपने हेमंत रासने यांना मैदानात उतरवले. पण, रविंंद्र धंगेकर यांनी सासने यांच्यावर 10,940 मतांनी आघाडी घेत भाजपला धूळ चारली. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने जायंट किलर ठरले आहेत. त्यांच्या विजयाचे जोरदार कौतुक केले जात आहे.