काँग्रेसचे (Congress) दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमति देशमुख (Amit Deshmukh) भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. अमित देशमुख यांच्याकडून याबाबत कोणतीच प्रतिक्रिया आली नाही. मात्र, प्रसारमाध्यमांतून जोरदार चर्चा सुरु आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी संभाव्य भाजप प्रवेशाबाबत सूचक विधान केले आहे. या विधानानंतर या पक्षप्रवेशाची चर्चा अधिक जोरदार होऊ लागली आहे. दुसऱ्या बाजुला संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी मात्र, अमित देशमुख यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबद्दल विरोधी सूर आळवला आहे.
भाजप प्रदेशाध्य चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रसारमाध्यमांनी अमित देशमुख यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाबद्दल विचारण्यात आले. यावर बोलताना नजिकच्या काळात अनेक मोठेमोठे स्फोट होणार आहेत. भाजपमध्ये अनेक बडे नेते प्रवेश करणार आहेत. सर्व काही झाले आहे फक्त वेळ आणि ठिकाण ठरवणे बाकी आहे, असे विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. ते औरंगाबाद येथे बोलत होते. भाजपमध्ये झालेले पक्षप्रवेश पाहून महाराष्ट्राला धक्का बसेल अशी पुस्तीही बावनकुळे यांनी जोडली. (हेही वाचा, Tejas Thackeray: राजकारणात तेजस ठाकरे यांची एन्ट्री? मुंबईत झळकलेल्या पोस्टरमुळे राजकीय चर्चांना उधान)
दरम्यान, अमित देशमुख यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर यांना मात्र मुळीच रुचली नाही. त्यांनी थेट अमित देशमुख यांच्या विरोधात सूर आळवत टीका केली आहे. अमित देशमुख हे लातूरचे प्रिन्स आहेत. त्यांना सत्तेत राहायला आवडते. ते लोकांमध्ये कधीच गेले नाहीत. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश कोणालाच आवडणार नाही. भाजप कार्यकर्त्यांनाही तो आवडणार नाही. त्यामुळे अमित देशमुख यांच्या भाजप प्रवेशास आमचा विरोध राहील असे विधान संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे.
अमित देशमुख यांनी मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. प्रसारमाध्यमांनी मात्र, अमित देशमुख यांचे नाव घेऊन वृत्त दिले आहे. त्यामुळे अमित देशमुख यांच्या मनात नेमके चाललंय तरी काय याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे.