CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC Civil Service Examination) नागरी सेवा परीक्षेत यशस्वी झालेल्या राज्यातील उमेदवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी अभिनंदन केले आहे. या यशस्वी उमेदवारांनी राज्य आणि देशाच्या विकासात योगदान देण्याची संधी मिळवली आहे. ही बाब राज्यासाठी अभिमानास्पद असल्याचे नमूद करून ते या संधीचेही सोने करतील, असा विश्वासदेखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

यासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्या यशाने मराठी झेंडा फडकविणाऱ्या यशस्वींचे मनःपूर्वक अभिनंदन. तुमच्या कष्टाने स्वप्नाला गवसणी घातलीच आहे. आता तुम्ही आपला समाज, राज्य आणि देशाच्या विकासात योगदान देण्याची संधी मिळवली आहे. त्याचाही अभिमान आहे. या संधीचे तुम्ही निश्चित सोने कराल, असा विश्वास वाटतो. या वाटचालीत तुमच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या आई-वडील, पालक यांच्यासह गुरूजन, मार्गदर्शकांचेही अभिनंदन आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. (हेही वाचा - सार्वजनिक ग्रंथालयांच्या देय थकित अनुदानासाठी 30 कोटी 93 लाख रुपयाचा निधी मंजूर; उदय सामंत यांची माहिती)

दरम्यान, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कोल्हापुरमधील तिघांनी घवघवीत यश मिळवलं आहे. यामध्ये 2 तरुणी आणि एका तरुणाचा समावेश आहे. ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या डॉ. प्रणोती संजय संकपाळ यांनी दुसऱ्या प्रयत्नात तर कोल्हापुरमधील गौरी नितीन पुजारी यांनी तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवलं आहे.